पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:29+5:302021-09-03T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गरोदर माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरोदर माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाते. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत "मातृ वंदना सप्ताह साजरा करावयाचा असून, सप्ताहादरम्यान जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर माताना पुरेसा पोषण आहार मिळावा व आणि किमान उपाचारासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. आर्थिक व सामाजिक ताणतणावामुळे खूप स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत सतात, तसेच बाळाच्या जन्मानंतर लवकरच कामास सुरुवात करतात. तथापि, अशावेळी त्यांचे शरीराची काम करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता पूर्वपदावर येण्यास मज्जाव होतो व बाळाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ स्तनपान करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. प्रसूती अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या जिवंत बाळाकरीता मातेस विश्रांती मिळण्याकरीता बुडीत मजुरीचा लाभ देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत टप्याटप्याने पाच हजार रुपये गरोदर माता व स्तनदा मातांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर व स्तनदा मातांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येतो.
-------
तीन टप्प्यात मिळणार पैसे
प्रत्येक नोंदणीकृत व पात्र लाभार्थी महिलेला शासनाकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यात पहिला हप्ता १ हजार रुपये नोंदणी केल्यानंतर १५० दिवसांच्या आता दिला जातो. त्यानंतर दुसरा हप्ता सहा महिने पूर्ण झाल्यावर तर तिसरा दोन हजार रुपयांचा हप्ता बाळाचा जन्म झाल्यावर दिला जातो.
------
पात्रतेचे निकष काय
गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे, लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड देणे, लाभार्थीचे आधारकार्डशी जोडलेले बँक खाते, बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण.
--------
लाभासाठी कोठे करायचा संपर्क
या योजनाचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी दवाखान्यात नोंद करणे आवश्यक आहे. तसेच अंगणवाडी सेविका अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये माहिती मिळते.
------
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत मातृ वंदना सप्ताह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून, पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून कुपोषित बाळ जन्माला येवू नये याकरीता आपल्या नजीकच्या शासकीय संस्थेत किंवा आशा स्वयंसेविका किंवा अंगणवाडी सेविका यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.
- प्रमोद काकडे, आरोग्य सभापती
------