गुन्ह्यात हेतू दिसला, संशय आहे पण...; डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलिस, सरकारला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 08:45 AM2024-05-11T08:45:08+5:302024-05-11T08:45:28+5:30
एका युक्तिवादात बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन केले होते, ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे गुन्ह्याचे समर्थन करणे योग्य नाही. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आला; त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे; मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलिस, सरकारी पक्ष अपयशी ठरले. गुन्ह्यातील सहभागी विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधातदेखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे,’ असे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी शुक्रवारी निकाल देताना नमूद केले.
एका युक्तिवादात बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन केले होते, ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे गुन्ह्याचे समर्थन करणे योग्य नाही. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.
वरच्या कोर्टात जावे : शरद पवार
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल हा कोर्टाचा निर्णय आहे. तीन जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने वरच्या कोर्टात अपील करावे, असे शरद पवार यांनी सुचवले आहे.
पुनाळेकरांचा अर्ज फेटाळला
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४० नुसार खोटे पुरावे सादर केल्याप्रकरणी तपास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असा अर्ज ॲड. संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयाकडे सादर केला होता. मात्र, अर्जात तथ्य नसल्याने तो नामंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातून सनातनचे साधक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, सनातन संस्था ही हिंदू दहशतवादी असल्याचे सिद्ध करण्याचा शहरी नक्षलवाद्यांचा डाव फसला, असा दावा संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेने निकालानंतर आपली भूमिका मांडली. यावेळी सनातन संस्थेचे पदाधिकारी सुनील घनवट, अभय वर्तक आदी उपस्थित होते.
दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा नसल्याचा युक्तिवाद
‘सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारल्याचे सिद्ध झाले असून, खून केल्याच्या गुन्ह्याबाबत फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते,’ असे सांगत न्यायाधीशांनी आरोपी व त्यांच्या वकिलांना विचारणा केली. त्यावर ‘हा दुर्मिळातील दुर्मीळ (रेअरेस्ट ऑफ द रेअर) गुन्हा नसल्याने त्यामध्ये फाशी देता येणार नाही,’ अशी विनंती बचाव पक्षातर्फे करण्यात आली.
‘त्या’ तिघांविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ
आमच्याकडे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात पुरावे होते. कोल्हापूरचा संजय अरुण साडविलकर या एका साक्षीदाराने तावडेविरुद्ध साक्ष दिली होती; पण तरीही आम्ही निकालाचे स्वागत करतो.
- प्रकाश सूर्यवंशी, सीबीआयचे वकील
डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. हे दोन्ही आरोपी पानसरे, गौरी लंकेश प्रकरणांतदेखील आहेत. ज्या तीन आरोपींना निर्दोष सोडले, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार आहोत. - मुक्ता दाभोलकर
वेळोवेळी आरोपी बदलण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारावर ही शिक्षा दिली गेली. ती ग्राह्य धरू नये, असा आमचा युक्तिवाद होता. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. अंदुरे आणि कळसकर नक्की सुटतील.
- ॲड. प्रकाश साळसिंगीकर, बचाव पक्षाचे वकील
आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली असली, तरी पानसरे खून खटल्यात त्याचा सहभाग आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी सबळ पुरावे न्यायालयात निदर्शनास आणावेत.
- मेधा पानसरे, गोविंद पानसरे यांची सून
सीबीआयच्या वकिलांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात पुरावे दिले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले होते. तिघांविरुद्ध सीबीआयला विनंती करून उच्च न्यायालयात जाऊ. आमच्या दृष्टीने तिघांविरुद्ध पुरावे आहेत आणि त्यांना शिक्षा होणेही गरजेचे आहे.
- डॉ. ओंकार नेवगी, दाभोलकरांचे वकील
सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे या कटाचे सूत्रधार असल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम केले हे माहिती नाही. पण ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनाच दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य मुद्यांवर निकालात भाष्य नाही. त्यामुळे या निकालावर समाधानी नाही. सनातन संस्थेची भूमिका तपासली जावी.
- पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री