मोटार वाहन निरीक्षकाला फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:27 AM2018-08-25T01:27:59+5:302018-08-25T01:28:37+5:30
भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांच्या चेहऱ्याला काळे फासले. हा प्रकार कासारवाडी येथील
पिंपरी : भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांच्या चेहऱ्याला काळे फासले. हा प्रकार कासारवाडी येथील आयडीटीआर संस्थेच्या आवारात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक सिद्धराम जोतेप्पा पांढरे (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौतम पंडित सुराडकर, निरज प्रभाकर कडू यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांढरे हे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आयडीटीआर संस्थेच्या आवारात इंग्रजी आठ आकाराच्या संगणकीय चाचणी पथावर होते. त्या वेळी सुराडकर व कडू यांच्यासह प्रहार संघटनेचे दहा ते बारा कार्यकर्ते त्याठिकाणी आले. ‘तुम्ही भ्रष्टाचार करता’ असे पांढरे यांना म्हणत त्यांच्या चेहºयाला काळे फासले. यासह ‘प्रहार संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा देत सरकारी कामात अडथळा आणला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.