शेतात मोलमजुरी करून तो झाला मोटार वाहन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:15 AM2018-04-06T02:15:04+5:302018-04-06T02:15:04+5:30

आज परिस्थिती अनुकूल असताना शिक्षणाच्या नावाखाली नसते उद्योग करून आई-वडिलांना नाहक त्रास देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 The motor vehicle inspector was made to work in the field | शेतात मोलमजुरी करून तो झाला मोटार वाहन निरीक्षक

शेतात मोलमजुरी करून तो झाला मोटार वाहन निरीक्षक

Next

लोणी काळभोर - आज परिस्थिती अनुकूल असताना शिक्षणाच्या नावाखाली नसते उद्योग करून आई-वडिलांना नाहक त्रास देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, अवघा ६ महिन्यांचा असताना आई देवाघरी गेल्याने मायेचे छत्र हरपलेल्या मुलाने मोठ्या भावाच्या सहकार्याने शेतात मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत ४९६ वा क्रमांक मिळविला आहे. तरुणांपुढे नवीन आदर्श ठेवल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौतम सुभाष कांबळे ( वय २७, सध्या रा. कवडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, मूळ रा. भवानी पेठ, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण यश संपादन केलेल्या मुलाचे नाव आहे. गौतम सहा महिन्यांचा असताना आई मरण पावली. त्या नंतर काका व मावशीने त्यांचे कुटुंब कवडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आणले. काका व मावशी येथील मनीष अशोक काळभोर यांच्या शेतात मोलमजुरी करत होते. त्यामुळे गौतम व त्याचा थोरला भाऊही तेथेच शेतात मोलमजुरी करू लागले.
गौतमने कवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये घेतले. दहावी-बारावीच्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला होता. बारावीनंतर जातपडताळणी दाखल्या बाबत माहिती नसल्याने त्याचे एक वर्ष वाया गेले. कारण फी भरायला पैसेच नव्हते. परंतु, तरीही हिंमत न हारता गौतमने पुढच्या वर्षी सीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन मेकॅनिकलला प्रवेश मिळवला होता.
नंतर शेतीमध्ये मोलमजुरी करत करत त्याने पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मेकॅनिकलची पदवी (बीई) संपादन केली. त्यानंतर हडपसर येथील महात्मा फुले महाविद्यालयात एमबीए (फायनान्स) ही पदवी मिळवली. हे यश मिळवण्यासाठी थोरला भाऊ श्रावण, ज्याने मजुरी करून गौतमला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले व ज्यांच्या शेतात मोलमजुरी केली ते मनीष अशोक काळभोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे तो नम्रपणे मान्य करतो. सहा महिन्यांचा असताना आई मरण पावलेल्या गौतमने नियतीशी लढा देत यश संपादन केले.

परीक्षेत ४९६वा क्रमांक
महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असताना त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक’ या पदाची पूर्व परीक्षा २९ मार्च २०१७ रोजी दिली होती. ती उत्तीर्ण झाल्यानंतर ६ आॅगस्ट २०१७ रोजी मुख्य परीक्षा दिली. ही परीक्षा ८३३ जागांसाठी झाली होती. त्यात त्याने ४९६वा क्रमांक मिळवला आहे.

Web Title:  The motor vehicle inspector was made to work in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.