मोटरसायकल रेस करणे घरमालकाला पडले महागात; भाडेकरुने पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून
By विवेक भुसे | Published: November 22, 2023 02:14 PM2023-11-22T14:14:29+5:302023-11-22T14:15:01+5:30
मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे आवाजाच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाला होता
पुणे : मोटरसायकल रेस करणे एका घरमालकाला चांगलेच महागात पडले. भाडेकरुने मारहाण करुन पाण्याचे टाकीत बुडवून त्यांना जीवे मारले. लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) याला अटक केली आहे.
दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याबाबत प्रथमेश संतोष घुले (वय १९, रा. घुले वस्ती, मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार खंडोबा माळ येथे घुले यांच्या घराच्या पार्किंगमधील पाण्याचे टाकीत सोमवारी दुपारी दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले हे घरमालक असून फिर्यादी यांचे चुलते आहेत. संतोष धोत्रे हा घुले यांचा भाडेकरु आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारु पिले. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरु करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा संतोष याने दादा घुले यांना मारहाण करुन पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात दादा घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संतोष धोत्रे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.