Pune: मोटारसायकल, चंदन झाडे चोरणाऱ्याच्या ओतूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 02:40 PM2023-10-28T14:40:31+5:302023-10-28T14:41:45+5:30
गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे....
ओतूर (पुणे) : ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ओझर नं. १ येथील शेतकरी संतोष सुदाम मांडे यांनी घरासमोर अंगणात लावलेली मोटारसायकल (एमएच १४ डीजी ६६५१) चोरीला गेली होती. तर ४ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास संतोष मांडे यांच्या शेतातील चंदनाची झाडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबाबत ओतूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केला होता. त्यानुसार शिवाजी अभिमन्यू सूर्यवंशी (वय २६, रा. डोळासणे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
अटक आरोपी शिवाजी अभिमन्यू सूर्यवंशी याच्याकडे आणखी एक मोटारसायकल (एमएच १४ डीई ३९१५) ही मिळून आली. ती त्याने अवसरी ता. आंबेगाव येथून चोरल्याची कबुली दिल्याने त्याबाबत मंचर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. याप्रमाणे आरोपी शिवाजी अभिमन्यू सूर्यवंशी याने ओतूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल व चंदनाची झाडे चोरी असे २ गुन्हे व मंचर पोलिस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ३ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.