‘सारथी’ची चाल धिम्या गतीने
By admin | Published: November 17, 2014 05:05 AM2014-11-17T05:05:15+5:302014-11-17T05:05:15+5:30
महापालिकेने पुणेकरांना उत्कृष्ट व जलद नागरी सुविधा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ‘सारथी’ योजना राबविण्याची संकल्पना एक वर्षांपूर्वी मांडली होती.
हणमंत पाटील, पुणे
महापालिकेने पुणेकरांना उत्कृष्ट व जलद नागरी सुविधा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ‘सारथी’ योजना राबविण्याची संकल्पना एक वर्षांपूर्वी मांडली होती. परंतु, विद्यमान स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांना योजनेचा विसर पडल्याने सारथी योजनेचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना आजही नागरी सुविधांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांना जलद गतीने नागरी सुविधा देण्यासाठी गतिमान व पारदर्शक प्रशासनाच्या ‘सारथी’ योजनेची पिंपरी-चिंचवड महापालिकेने यशस्वी अंमलबजावणी केली. त्यासाठी महापालिकेतील विविध विभाग संगणकाने जोडून नागरिकांना अॉनलाइन सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे महापालिका व क्षेत्रीय कार्यालयातील हेलपाटे कमी झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सारथीची यशस्वी योजना पुणे महापालिकेत राबविण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी पुढाकार घेतला होता.
गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत जाऊन प्रत्यक्ष या योजनेची माहिती घेतली. त्यानुसार संबंधित कंपनीला पुणे महापालिकेत ही योजना राबविण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार महापालिकेतील सर्व विभाग व १५ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन करण्यात येणार होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी व अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान व पारदर्शक होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाकडूनही ई-गर्व्हनस योजनेअंतर्गत या योजनेला अनुदान प्राप्त होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या संगणक विभागाने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतली.
मात्र, स्थायी समितीच्या या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.
त्याविषयी विद्यमान स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनी त्याचा एकदाही आढावा घेतलेला नाही. त्यामुळे पुणेकरांना महापालिकेत एक दाखल्यासाठी आजही हेलपाटे
मारावे लागत असल्याचे चित्र अद्याप बदललेले नाही. (प्रतिनिधी)