कनेरसरमध्ये नियम धाब्यावर बसवून डोंगर होतोय भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:36 PM2019-06-20T15:36:07+5:302019-06-20T15:41:33+5:30
गौणखनिज उत्खननासाठी शासनाची परवानगी न घेता, रॉयल्टी न भरता राजरोसपणे काम चालू आहे...
पुणे : कनेरसर (ता. खेड, जि. पुणे) येथे दोन कंपन्यांनी तीन महिन्यांपासून डोंगराचे सपाटीकरण सुरू केले आहे. औद्योगिकीकरणासाठी सपाटीकरण होत असले तरी गौणखनिज उत्खननासाठी शासनाची परवानगी न घेता, रॉयल्टी न भरता राजरोसपणे काम चालू आहे.
डोंगरावरील वृक्षही बेकायदा हटविले आहेत. या उत्खननाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांना देऊन काम थांबवले जावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भाजप युवा मोर्चाचे माजी खेड तालुकाध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून कंपन्यांना काम थांबविण्याच्या सूचना देऊनही काम चालू आहे, अशी चर्चा परिसरात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
एसईझेड शासनाने स्थापन केले, नंतर रद्द केले, कनेरसर परिसरात आठ-दहा कंपन्यांचे उत्पादन सुरू आहे. रोजगारनिर्मिती व विकासासाठी औद्योगिकीकरण गरजेचे आहे, परंतु नियम धाब्यावर बसवून विकास कशासाठी? डोंगरावर असलेले वृक्ष आधुनिक यंत्रसामग्रीने भुईसपाट केले असून गौणखनिज उत्खनन करून सपाटीकरण वेगाने चालू आहे. डोंगर उत्खननाला शासनाने परवानगी दिली आहे किंवा नाही, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास दौंडकर यांनी माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे माहिती अधिकारान्वये निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र शासन वृक्षलागवडीसाठी जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवित असताना विकासाच्या गोंडस नावाखाली परदेशी कंपन्या भारतात येऊन वनसंपदा नष्ट करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. महसूलमंत्री व उद्योगमंत्री यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली असून विधानसभा अधिवेशनात याप्रकरणी विधान परिषद सदस्यांच्या माध्यमातून लक्षवेधी मांडून शासनापुढे प्रश्नाचे गांभीर्य मांडले जाईल, असे टाव्हरे यांनी सांगितले.
.........
ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित ठिकाणी गेले तिथे येण्यास मज्जाव केला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या मदतीने उत्खनन करण्याचा सपाटा सुरू आहे. यावेळी मुरुमाची वाहतूक करण्यासाठी हायवा ट्रक वाहनात मुरुमउपसा सुरू असल्याने या घटनेचा पंचनामा करून वरिष्ठाकडे पाठविला आहे. - मोहिनी लोंढे, (तलाठी, कनेरसर मंडल)