कात्रजमध्ये डोंगरांची लचकेतोड
By admin | Published: May 29, 2017 03:08 AM2017-05-29T03:08:04+5:302017-05-29T03:08:04+5:30
कात्रज भागातील सर्व अनधिकृत मोठी बांधकामे, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल यांच्यावर येत्या काही दिवसांत
लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : कात्रज भागातील सर्व अनधिकृत मोठी बांधकामे, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल यांच्यावर येत्या काही दिवसांत हातोडा पडणार आहे. सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या वतीने अधिकाऱ्यांसह पाहणी करून या भागातील सर्व अनधिकृत टेकडीफोड थांबविण्यात येणार आहे.
ऐतिहासिक कात्रजची ओळख म्हणजे कात्रजचा घाट व येथे असलेली डोंगरे. वाढत्या शहरीकरणामुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक प्लॉटिंगवाल्यांनी, बांधकाम व्यावसायिकांनी व हॉटेलचालकांनी या डोंगराची लक्तरे तोडली आहेत. येथील लाखो झाडे तोडून हजारो एकराची डोंगरे फोडली गेलेली आहेत. यापुढे या भागात अनधिकृतपणे होत असलेली ही कामे थांबविली जातील व सध्या जी चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांनी दिला आहे.
नमेश बाबर यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी प्रशासनाने आगम टेकडी, कात्रज भागातील अनेक ठिकाणी टेकट्यांवर बांधलेल्या घरांना नोटिसा दिल्यामुळे येथील गरीब नागरिक आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले, की शहरापेक्षा कमी पैशात आम्हाला या ठिकाणी १ गुंठा, दोन गुंठे प्लॉट मिळत असल्यामुळे आम्ही आमच्याजवळची सर्व जमा-पुंजी लावून या ठिकाणी ही जागा विकत घेतली. हे घेताना आम्हाला सांगण्यात आले, की याचे खरेदीखत होते, येथे रस्ते झाले आहेत, ड्रेनेजलाईन आल्या आहेत, लाईट आहे. पिण्याचे पाणी आहे, या भागात अधिकारी कधीच कारवाई करणार नाहीत, अशा भूलथापा देण्यात आल्या. हे घर जर पडले तर आमचा संसार उघड्यावर येणार आहे.
जेव्हा आम्ही बांधकाम केले त्यावेळीदेखील काही राजकीय नेत्यांनी आमच्याकडून कारवाई होणार नाही, म्हणून पैसे घेतले. आता आम्हाला नोटिसा आल्या आहेत. ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केले ते आता हात वर करीत आहेत.
प्रशासनाच्या आर्थिक हितसंबंधामुळेच या भागात अनधिकृत टेकडीफोड, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल आदी कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे आम्ही येत्या काळात एक-एक करून थांबवू व गरीब नागरिक या ठिकाणी या टेकडी फोडणाऱ्याच्या जाळ््यात अडकणार नाहीत, यासाठी येथील सर्व अनधिकृत टेकडीवरील प्लॉटिंग बंद करू, अशी माहिती बाबर यांनी दिली. नगरसेविका अमृता बाबर व (कै.) सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या वतीने पीमआरडीए, तहसील व पालिका यांना लेखी निवेदन देऊन या भागातील अधिकाऱ्यांसह पाहणी केली जाईल व तातडीने येथील सर्व कारवाई करून कात्रज टेकडी लचकेमुक्त केली जाईल.