कात्रज घाटावरील डोंगररांगेत भीषण वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:45+5:302021-02-11T04:13:45+5:30
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील डोंगररांगेमध्ये बुधवारी रात्री वणवा लागला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत ...
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील डोंगररांगेमध्ये बुधवारी रात्री वणवा लागला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पुणे महानगर विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. परंतु, डोंगरांची उंची पाहता तिथपर्यंत वाहने पोचू शकली नाहीत. जवानांनी वनविभागाच्या मदतीने झाडांच्या फांद्या तोडून ही आग विझविण्याचा प्रयत्न चालविला होता.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साधारणपणे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कात्रज घाटातील बोगद्याच्या वरच्या डोंगरांमध्ये आग लागली. सध्या डोंगरांवरील गवत आणि झाडोरा वाळलेला असल्याने घर्षणामुळे आग लागू शकते, असे सांगण्यात आले. ही आग रात्रीच्या अंधारात लांबूनही दिसत होती. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झपाट्याने आग पसरत चालली होती. याबाबत काही नागरिकांनी छायाचित्रे आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर पाठविले.
याबाबत वनविभागाला माहिती समजताच उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी संबंधित क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना केले. दरम्यान, हे क्षेत्र खासगी मालकी क्षेत्र असल्याचे तसेच ते वन क्षेत्र नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. ही हद्द पीएमआरडीएची असल्याने त्यांनाही माहिती कळविण्यात आली. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दोन बंबांसह १५ जवान घटनास्थळी रवाना केले. डोंगराच्या खाली उभ्या करण्यात आलेली ही वाहने वर जाऊ शकली नाहीत. तसेच, या वाहनांमधील पाण्याचे पाईपही वरपर्यंत नेता आले नाहीत.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अग्निशामक दलाचे जवान डोंगर चढत वर गेले. झाडांच्या आणि झुडपांच्या ओल्या फांद्या तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. आग वेगाने पसरत चालल्याने आणखी मनुष्यबळ मागविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याची ही कसरत सुरू होती. हे क्षेत्र वन विभागाचे होते की नव्हते, या आगीमध्ये वन्य जीव होरपळले आहेत काय हे रात्रीच्या अंधारात समजत नव्हते. आग विझल्यानंतर दिवसाउजेडीच याबाबत समजू शकेल असे अग्निशामन अधिकारी सुजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.