याद्यांचा घोळ, मतदारांचा खोळंबा

By admin | Published: February 22, 2017 02:32 AM2017-02-22T02:32:31+5:302017-02-22T02:32:31+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत मतदान पार

Mourning of memories, detention of voters | याद्यांचा घोळ, मतदारांचा खोळंबा

याद्यांचा घोळ, मतदारांचा खोळंबा

Next

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी वेळेत स्लिपा न मिळाल्याने मतदान केंद्रावर नाव शोधताना गोंधळ उडाला होता, तर काही ठिकाणी मतदान केंद्रावरील मशिन बिघडल्यामुळे काही काळ मतदारांचा खोळंबा झाला होता. सायंकाळनंतर मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी झाली होती.
खेड तालुक्यात ७ जिल्हा परिषद गटांसाठी व १४ पंचायत समिती गणांसाठी शांततेत मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. साडेतीनपर्यंत १ लाख २९ हजार ९ मतदारांनी हक्क बजावून ५२.७० टक्के मतदान झाले होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा असल्यामुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. अनेक मतदान केंद्रांवर केंद्रातील मतदार यादी व कार्यकर्त्यांकडील मतदारयादी यामध्ये बदल असल्याने मतदारांचा गोंधळ होत होता. राक्षेवाडी येथील मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे मतदारांचा तिथे खोळांबा झाला.
इंदापूर तालुक्यात सकाळी साडेसातपासून तालुक्यातील ३०५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली. दुपारच्या वेळी मतदान केंद्रे ओस पडली होती. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर पंचायत समिती गणासाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. मतदान संपल्यानंतर शहरात घोषणाबाजी झाली. एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी निकालाआधीचफटाके वाजवले. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहरातील मतदान केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने मतदारांना चांगलेच हेलपाटे मारावे लागले.


बारामतीत कुठेही अनुचित प्रकार नाही

बारामती तालुक्यात अंदाजे ७२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सत्ताबदलानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकांचे मतदान पार पडले. बारामतीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉँग्रेसला भाजपाने तगडे आव्हान दिले आहे.
मतदान शांततेत पार पडले, तालुक्यात कुठेही गंभीर अनुचित प्रकार घडला नाही.

तांत्रिक अडचणीमुळे मतदानाला विलंब
पुरंदर तालुक्यात दुपारी सुमारे ३८ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचल्याने उमेदवारांची गावे वगळता इतर मतदान केंद्रावर मतदारांची संख्या तुरळक होती. दुपारी ३ नंतर मतदानाचा वेग वाढला. पश्चिम पुरंदरच्या पट्ट्यातील भाविक आज वीर येथील यात्रेला गेलेले असल्याने दुपारनंतर भाविक येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
यात्रेहून परतलेल्या मतदारांनी सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने दिवे गराडे गटात कोडीत बुद्रुक येथे रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. बोपगाव येथेही मतदान केंद्रावरील तांत्रिक अडचणीमुळे मतदान उशिरापर्यंत सुरू ठेवावे लागले.


तरुणाईचा प्रतिसाद

 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती केली जात होती. त्याचा परिणाम जाणवला. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या बरीच होती. स्वत:चा सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर अनेकांनी टाकला.


मतदानापासून राहावे लागले वंचित
 मतदारयादीतील चुकांमुळे व मतदारयादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी मतदारांच्या स्लिपा बीएलओ, तलाठी, ग्रामसवेक यांनी वाटायला सुरुवात केल्याने त्या सर्व मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत.
 स्लिपा न मिळाल्याने मतदानासाठी येणाऱ्या मतदाराला आपले नाव व क्रमांक शोधण्यासाठी धावपळ करावी लागत होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा स्लिपांचा गोंधळ कायम राहीला. अनेकांना मत देण्यापासून वंचित रहावे लागले.


आदिवासी भागातील केंद्रांवर शुकशुकाट
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणात आज मतदान पार पडले.
मतदार यादीतील गोंधळामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत अडथळे आले. आदिवासी भागातील अनेक केंद्रांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात आज पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाचे योग्य नियोजन, घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर दुर्गम भागातील केंद्रांना भेटी देऊन शांततामय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. काही केंद्रांवर मतदार यादीतील गोंधळामुळे नावे सापडण्यास अडचणी येत होत्या.

Web Title: Mourning of memories, detention of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.