‘होम क्वारंटाइन’ कोरोना रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:48+5:302021-03-20T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ (दर शंभर चाचण्यांमागे आढळणारी बाधितांची संख्या) साडेतेवीस टक्क्यांवर गेला आहे. गृह विलगीकरणामध्ये (होम क्वारंटाईन) असणारे रुग्ण हे नियम आणि शिस्त पाळत नसल्याने या सर्व कोरोना रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवण्यात यावे, असा प्रस्ताव प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव समितीला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण समितीची बैठक शुक्रवारी (दि. १९) झाली नाही. गेल्या बैठकीत ३१ मार्च पर्यंतचे निर्देश समितीने दिले आहेत. त्यामुळे कोणतेही नवे निर्बंध प्रशासनाने लागू केले नाहीत. मात्र प्रशासकीय पातळीवर गेले दोन दिवस आढावा घेण्यात आला.
पुणे शहर आणि जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या २६ हजार ७९२ आहे. यात गृह विलगीकरणात असणारे कोरोना रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात १२ हजार ८८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ६ हजार ९८८ आणि ग्रामीण क्षेत्रात २ हजार १९८ आहेत. गृह विलगीकरणातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कोरोना विषयक नियम आणि शिस्त पाळली जात नाही. परिणामी या रुग्णांकडूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचे निरिक्षण आहे. त्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्याची शिफारस पुढे आली आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे घरी असणाऱ्या कोरोना रुग्णांना या केंद्रांमध्ये दाखल करावे, असे सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कोव्हिड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या केंद्रावरील रिक्त करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची पदे पूर्ववत करून त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देखील जिल्हा परिषदेने काढले आहेत.
चौकट
जिल्ह्यात चाळीस हजार ४४० खाटा
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून सध्या चाळीस हजार ४४० खाटा उपलब्ध आहेत. याशिवाय ७११५ ऑक्सीजन खाटा आहेत. अतिदक्षता खाटांची संख्या २ हजार ६३७ आहे. व्हेंटिलेटर खाटा १२११ आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या २०१९ आहे.
चौकट
मृत्यूदर एकदम कमी
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून सक्रीय रुग्णांची संख्या २६ हजार ७९२ पर्यंत गेली आहे. जिल्ह्याचा सद्यस्थितीतील मृत्युदर ०.४. टक्के एवढा आहे.
चौकट
सक्रीय रुग्ण पावणेनऊ लाखांवर?
राज्य शासनाने संभाव्य कोरोना रुग्ण संख्येसंबंधीचा आराखडा एक मार्चला तयार केला. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात ३१ मार्च अखेरीस ८ लाख ७१ हजारांपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १९) जिल्ह्यातल्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या चार लाख ४० हजार २४८ पर्यंत गेली. हे पाहता प्रशासनाचा अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता आहे.