कोरेगाव भीमाचा बाजार हलविणार
By Admin | Published: March 2, 2016 01:13 AM2016-03-02T01:13:52+5:302016-03-02T01:13:52+5:30
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील वाहतूककोंडी बाजारामुळे होतच नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडतानाच अवैध वाहतूक व बेशिस्त पार्किंगमुळेच कोंडी
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील वाहतूककोंडी बाजारामुळे होतच नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडतानाच अवैध वाहतूक व बेशिस्त पार्किंगमुळेच कोंडी होत असल्याचे छायाचित्रासह निदर्शनास आणून दिले. तरीही बाजार हटविण्यावर प्रशासन ठाम आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेटण्याचा निर्णय घेतला आहे, तर प्रातांधिकारी सोनप्पा यमगर यांनी बाजार स्थलांतरासाठी १ आठवड्याची मुदत ग्रामस्थांना दिली.
येथील आठवडे बाजार स्माशनभूमी परिसरात स्थलांतरित करा; अन्यथा बाजार परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आज प्रांताधिकारी यमगर यांनी शिरूर तहसील कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेतली. या वेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष नारायणराव फडतरे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले, सदस्या वृषाली गव्हाणे, संगीता कांबळे, शारदा गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, रमेश शिंदे, भाऊसाहेब भालेराव आदी उपस्थित होते.
बैठकीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अवैध वाहतुकीचा मुद्दा समोर ठेवत बाजारमुळे वाहतूककोंडी होत नसल्याचे ठामपणे मांडले. गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांनी समक्ष पाहणी केली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पादचारी मार्ग अर्धवट काढल्याने व त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण न केल्याने रस्ता मोठा होऊ शकला नाही. त्यामुळे बाजारसाठी शासनाने वनखात्याची जागा द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तरीही बाजार हटविण्यावर प्रशासन ठाम आहे. (वार्ताहर)