हवेली तालुक्याचे विभाजनाच्या हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:30+5:302021-02-13T04:13:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्याचे विभाजन होणार, हवेलीचे दोन तालुके होणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली तालुक्याचे विभाजन होणार, हवेलीचे दोन तालुके होणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यावर हवेली तालुक्यातील उरुळी कांचन व कळस, वाघोली, थेऊर या चार मंडलाधिकारी कार्यालयातील तब्बल ५० महसुली गावांतील कार्यक्षेत्रासाठी अपर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती करून एक प्रकारे शिक्कामोर्तब केला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ राज्यातील काही जिल्ह्यांपेक्षाही जास्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे. त्यातच हवेलीतील पूर्व भागातील वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात प्रशासकीय कामे राबवणेसाठी व नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वंतत्र गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कायमस्वरुपी तहसीलदार, नायब तहसीलदार या अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे हवेलीचे महसूली विभाजन करून पूर्व हवेलीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने स्वतंत्र तहसील कार्यालय पूर्व भागातच असावे, ही मागणी शासनस्तरावर व पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे. संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नव्याने पदनियुक्ती होईल.
यापूर्वीच हवेलीतील तहसील कार्यालयाच्या हद्दीतील ३० गावे अप्पर तहसील पिंपरी-चिंचवडला जोडली असून अद्यापही १३० गावांचा महसूली कारभार हवेली तहसील कार्यालयातून चालवला जात होता. १३० गावांसाठी तालुक्यामध्ये ४६ तलाठी सज्जा असून यावर ८ मंडलाधिकारी आहेत. ४६ गावकामगार तलाठीमधील ५ तलाठी भाऊसाहेबांच्या हवेली प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात ड्राफ्टेड बदल्या झालेल्या आहेत, त्यामुळे काही तलाठ्यांकडे अतिरिक्त कार्यभाराचा बोजा कायम असल्याने दोन्ही सज्जांमधील कामकाज पाहताना त्यांची दमछाक होते.