दोन महिन्यांच्या वेतनासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 'जम्बो'हॉस्पिटलमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:56 PM2020-10-17T13:56:54+5:302020-10-17T14:03:59+5:30
जम्बो रुग्णालयात काम करीत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शनिवारी सकाळी आंदोलन करावे लागले.
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात काम करीत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शनिवारी सकाळी आंदोलन करावे लागेल. अधिकार्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रुग्णांना त्रास नको म्हणून डॉक्टरांनी शिफ्ट बदलण्याच्या वेळात सकाळी सात वाजता हे आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांमध्ये 'लाईफलाईन एजन्सी'सोबत काम केलेल्या डॉक्टरांचा समावेश आहे. लाईफलाईन चे अधिकारी फोनही घेत नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे लाईफलाईनच्या काळातील तसेच या महिन्याभरातील पगार मिळावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.
जम्बो कोविड रुग्णालय सुरू केल्यानंतर या ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचे काम 'लाईफलाईन' या एजन्सीकडे देण्यात आले होते. परंतु, पहिल्या दिवसापासूनच या एजन्सीने हलगर्जीपणा करीत रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड केली. त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. यामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासह अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. सर्व स्तरातून या एजन्सीच्या कारभाराविरुद्ध टीका होऊ लागल्यावर लाईफलाईनचे काम काढून घेण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडे येथील व्यवस्थापनाची सूत्रे देण्यात आली. महापालिकेने येथील व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेडीब्रोस या एजन्सीला पीएमआरडीएकडून जम्बो रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचे काम काम देण्यात आले. ९ सप्टेंबरपासून याठिकाणी मेडीब्रोसचे काम सुरू झाले.
जम्बो रुग्णालयात लाईफलाईन सोबत काम केले वीस-पंचवीस डॉक्टर आणि नर्स सध्या मेडिब्रॉस सोबत सुद्धा काम करत आहेत. या डॉक्टरांना लाईफलाईनकडून अद्याप त्यांच्या कामाचे वेतन मिळालेले नाही. तसेच मेडीब्रोस एजन्सीला काम देऊन नुकताच एक महिना पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या महिन्याचे देखील वेतन मिळावे अशी मागणी डॉक्टरांनी केली. दरम्यान, या संदर्भात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मेडिब्रोसकडून दोन दिवसांपूर्वीच वेतनाची बिले पालिकेकडे देण्यात आली आहेत. ही बिले मान्य करून पीएमआरडीएकडे पाठविण्यात आलेली आहेत. लवकरच पालिका आणि पीएमआरडीए वेतनाचे पैसे देईल. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
--------
जम्बो रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स ला वेतन देण्याची जबाबदारी ही काम घेतलेल्या एजन्सीची आहे. महापालिका आणि पीएमआरडीए त्यांचे पैसे देणारच आह. या एजन्सीकडे काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासूनच ॲडव्हान्स रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु, करारामध्ये अॅडव्हान्स रक्कम देण्याची तरतूद नसल्याने हे पैसे देण्यात आले नव्हते. आता एक महिना पूर्ण झाल्यानंतर हे पैसे देण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.