तृप्ती देसार्इंच्या घरासमोर आंदोलन, शबरीमाला मंदिर प्रवेश वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:02 AM2018-11-17T03:02:54+5:302018-11-17T03:03:41+5:30
या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरातील शबरीमाला कर्म समितीचे सदस्य देसाई यांच्या धनकवडीमधील कार्यालयासमोर एकत्र आले.
धनकवडी : अयाप्पा स्वामीचा जय जयकार करीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या धनकवडी येथील कार्यालयासमोर पुणे परिसरातील शबरीमाला कर्म समितीच्या वतीने आंदोलन केले. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. परंतु केरळमधील आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू दिले नाही. त्यांना विमानतळावरच रोखले.
या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरातील शबरीमाला कर्म समितीचे सदस्य देसाई यांच्या धनकवडीमधील कार्यालयासमोर एकत्र आले. शबरीमाला मंदिराच्या प्रवेश प्रकरणावरून केरळमध्ये तणावाचे वातावरण असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट करीत आहेत. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे निवेदन यावेळी तृप्ती देसाई यांचे पती प्रशांत देसाई यांच्याकडे देण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, शबरीमाला सेवा समाज अध्यक्ष (महाराष्ट्र) नंदकुमार नायर, राजीव कुट्टीयाडो, प्रमोद नायर, दिलीप नायर, बाबू नबीयार, गणेश फापाळे, विश्व हिंदू परिषद बजंरग दलाचे नाना क्षीरसागर उपस्थित होते.