खतांची दरवाढ न थांबवल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:05+5:302021-05-17T04:09:05+5:30
ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे ...
ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे पेरणीची वेळ असताना काही खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे दर प्रतिबॅग १०० ते ९०० रुपयांनी वाढवले आहेत. एकीकडे कोरोनामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना त्यातच खतांची झालेली भरमसाठ दरवाढ म्हणजे बळीराजासाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीमध्ये अचानक दरवाढ केली आहे.
कोरोनासारख्या महामारीचा सामना करत शेतकरी रान दुरुस्त करून पेरणीची तयारी करत असताना खतांच्या किमतीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्याला परवडणारी नाही.
आगोदरच कोरोना व अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे शेतकरी फळ आणि भाजीपाल्याची लागवड करतात कोरोनामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे सद्य परिस्थितीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून पिकवलेला माल कमी वेळेत बाजारात आणून कसा विकायचा असा प्रश्न आहे. अशा संकटात शेतकरी असताना खत कंपन्यांनी खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.
जगाचा पोशिंदा बळीराजाला मदतीचा हात पुढे करून केंद्र सरकारने खतांची दरवाढ थांबवण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी बंधूच्या वतीने व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ लि. मंचरचे अध्यक्ष भगवानराव वाघ यांनी दिला आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर, संचालक मधुकर बो-हाडे,रमेश खिलारी, अनिल वाळूंज, नाथा घेवडे पा., संजय गोरे आदी उपस्थित होते.