‘एमपीएससी’त सामावून न घेतल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:23+5:302021-03-14T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत निवड होऊनही नियुक्ती न झालेल्यांना लवकर सेवेत सामावून घेतले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत निवड होऊनही नियुक्ती न झालेल्यांना लवकर सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन करु,” असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
सन २०१९ मध्ये परिक्षा होऊन निवड प्रक्रिया झालेल्या चारशेहून अधिक मुलांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. या विद्यार्थ्यांपैकी काहींवर शेतमजुरी करुन गुजराण करण्याची वेळ आली आहे. या नियुक्त्या कधी होणार याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेत आज आंदोलनाचा इशारा दिला. यात पडळकरही सहभागी झाले होते.
पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला रखडलेल्या नियुक्त्यांबाबत धारेवर धरले. पडळकर म्हणाले, “फडणवीस यांच्या काळात अधिकाऱ्यांची सर्वात मोठी भरती झाली. मराठा समाजाच्या आरक्षणात सरकार गंभीर नाही. त्यामुळे त्यांनी घोळ करून ठेवला. खंडपीठाने ९ डिसेंबरला सांगूनही त्यांनी नियुक्ती केली नाही. रात्रंदिवस काम करणाऱ्या मुलांनी यश मिळवले. सगळी मराठी गावगाड्यातली मुले आहेत. त्यांना नियुक्तीपत्र द्यावे.”
या प्रक्रियेत ७९ मराठा मुले सर्वसाधारण मधून निवडली गेली. त्यांच्यावर अन्याय का असा सवाल विचारत पडळकर म्हणाले, “इतर वर्गातील मुलांवर अन्याय का? येथे आणखीही विद्यार्थी येणार होते पण येथे दबावाचे वातावरण दिसते आहे. मुलांचे भविष्य वाया घालवू नका. हे भावी अधिकारी आहेत.” पोलिस दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करत आहे. गुुरुवारचे आंदोलनही पोलिसांनी मोडीत काढले, असा आरोप त्यांनी केला.
चौकट
विद्यार्थ्यांचा इशारा
-सरकारने आंदोलनाची वेळ आणू नये. स्टाफ कमी असल्याचे म्हणता आणि नियुक्ती पत्र देत नाहीत हा विरोधाभास कसा काय? निवड होऊनही नियुक्ती न झालेल्यांना लवकर सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन करावे लागेल.