गॅस, पेट्रोल दरवाढीविरोधात मंचरमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:07+5:302021-07-07T04:13:07+5:30
मंचर : घरगुती वापराचा गॅस आणि पेट्रोलच्या किमती आकाशाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. ...
मंचर : घरगुती वापराचा गॅस आणि पेट्रोलच्या किमती आकाशाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे महागाई कमी करावी या मागणीसाठी आणि केंद्र सरकराच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मंचर येथे आंदोनल करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले की, घरामध्ये वापरला जाणारा गॅस सिलिडर हा पंचवीस रुपयांनी महागलेला आहे. पेट्रोल शंभरी पार झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना गॅस वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकूणच मध्यमवर्गीयांनाही आता घरामध्ये गॅसऐवजी चूल पेटवावी लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून विकास होतो आहे की, देश आणि जनता अधोगतीला नेत आहेत, असे चित्र दिसते आहे.
या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी जिल्हा कमिटीचे अजय आवटे, मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकित जाधव, बाबूराव दादा बांगर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळी बाळासाहेब बेंडे, रमेश खिलारी, सुहास बाणखेले, राहुल पडवळ, अरुणा थोरात, सुषमा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलकांनी या वेळी मास्कचा वापर करत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न केला.
--
उपविभागीय कार्यालयासमोर चुलीवर केल्या भाकरी
--
मंचर येथील उपविभागीय कार्यालयापर्यंत आंदोलकांनी बैलगाडीतून प्रवास करत पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. गाडीतून येताना केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महिलांनी थेट रस्त्यावरच चूल मांडून चुलीवर भाकरी थापल्या व गॅसदरवाढीचा निषेध केला. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे साऱ्यांचे आंदोलकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांना आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या निषेधाचे व महागाई कमी करण्याबाबत निवेदन दिले.
--