गर्भलिंगनिदान कायदा बदलासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2015 01:36 AM2015-12-10T01:36:48+5:302015-12-10T01:36:48+5:30
र्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदी काढून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सोनोग्राफीतज्ज्ञांनी सरकारला सहा
पुणे : गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदी काढून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सोनोग्राफीतज्ज्ञांनी सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. सरकारने प्रतिसाद न दिल्यास बेमुदत संपावर जाण्याचा आणि न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सोनोग्राफीतज्ज्ञांच्या संघटनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) पुणे शाखेने पुकारलेल्या सोनोग्राफी बंद आंदोलनाला राज्यातील सर्व डॉक्टरांच्या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर यांनीही सोनोग्राफी तज्ज्ञांच्या या आंदोलनाला लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे.
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदींच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील सर्व रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांनी तीन दिवसांचे काम बंद आंदोलन छेडले आहे.
डॉक्टरांची आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना असोसिएशनचे कार्यकारी व सल्लागार सदस्य डॉ. ए. बी. केळकर म्हणाले, गर्भलिंगनिदानाद्वारे स्त्री-भ्रूणहत्या करण्याच्या अमानवी कृतीचा आम्ही विरोध करतो. अशा सामाजिक गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. परंतु, स्त्री-भ्रूणहत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांना आणि रुग्णांच्या माहिती संकलनाच्या प्रक्रियेत कागदोपत्री किरकोळ त्रुटींसाठी एकच शिक्षा असू नये, आमचे ठाम मत आहे. प्रामाणिक सोनोग्राफीतज्ज्ञ डॉक्टरांना केवळ क्षुल्लक कागदोपत्री त्रुटींसाठी नाहक त्रास होऊ नये, यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत.
(प्रतिनिधी) असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी म्हणाले, की आमच्या मागण्यांच्यासंदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
गंभीर वैद्यकीय परिस्थितीतील रुग्णांसाठी सोनोग्राफीची अत्यावश्यक सेवा काही रुग्णालयांमध्ये सुरू ठेवण्यात आली आहे. उद्या हे काम बंद आंदोलन थांबविण्यात येणार असून प्रशासनाने याबाबत वेळेतच योग्य ती कार्यवाही करावी. अशाप्रकारे डॉक्टरांनी केलेल्या एकदिवसीय बंदचा रुग्णांना मोठा फटका बसला. या संपात आपण सहभागी नाही, असे दीनानाथ मंगेशकरसारख्या शहरातील काही मोठ्या हॉस्पिटल्सकडून सांगण्यात येत होते, मात्र तेथील कर्मचारी व रुग्णांनी सोनोग्राफीची सुविधा बंद असल्याचे सांगितले.