प्राध्यापक भरतीसाठी २१ जूनपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:39+5:302021-06-20T04:08:39+5:30
राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणावर परिणाम होत आहे. समितीच्या वतीने राज्य शासनाला सुमारे १८ वेळा ...
राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणावर परिणाम होत आहे. समितीच्या वतीने राज्य शासनाला सुमारे १८ वेळा निवेदने देण्यात आली. तसेच ४ वेळा शासनाबरोबर बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक वेळी शासनाने पदभरती केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. गेली पंधरा महिने हजारो नेट-सेट पीएचडीधारक प्राध्यापक पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्यामुळे समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक हे इतर मान्यताप्राप्त प्राध्यापकांप्रमाणेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतात. परंतु, त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे सीएसबी धोरण कायमस्वरूपी बंद करावे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आरक्षणासाठी विभाग व विषयनिहाय एकक न मानता विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून सहायक प्राध्यापक भरती करण्यात यावी,या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे, असेही पौळ यांनी स्पष्ट केले.