गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आंदोलन : डॉ़ राजेंद्र सिंह; पुण्यात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:54 PM2018-01-22T13:54:10+5:302018-01-22T13:57:19+5:30
साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी नमामी गंगा योजनेची घोषणा केली़ या घोषणेमुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या; परंतु आता साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.
पाणी अडवणे, साठविणे आणि जिरविणे, याबाबत डॉ. राजेंद्र सिंह यांनी केलेल्या कार्याबद्दल चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १६ वा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार’ त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता, उपाध्यक्ष श्रीधर गायकवाड, पुणे पीपल्स को. आॅप. बँकेचे उपाध्यक्ष सुभाष नडे, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया व किशोर धारिया आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ़ राजेंद्र सिंह म्हणाले, गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता़ हा निधीही उपलब्ध झाला. मात्र, त्यापैकी केवळ साडेतीन टक्केच निधी खर्च करण्यात आला. याप्रकरणी कॅगसह अनेक संस्थांनी ताशेरेही ओढले आहेत़ सध्या देशात खोटी कामे आणि आश्वासनांबाबत रेटून बोलले जात आहे़ देशात खºयाचे खोटे आणि खोट्याचे खरे बोलण्याची हुशारी या देशात यापूर्वी कधीही दिसली नव्हती, अशी टीका यांनी केली़ आपण आजपर्यंत लोकसहभागातून जलसंधारणाची ११ हजार ८०० कामे केली आहेत़ त्यानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन जलप्रदूषणविरोधी व जलजागृतीची चळवळ उभारावी, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले़
लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवा
डॉ. साळुंखे यांच्या जीवनाबद्दल सांगताना शरद पवार यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेख केला. पवार म्हणाले, साळुंखे यांनी शिकवणीला आलेल्या मुलीशी लग्न करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यामुळे पालकांनी मुलींना शिकवणीला पाठविताना लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवा, असा गमतीशीर सल्लाही पवारांनी दिला.
दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्प पुरेसा नाही. तर मोठी धरणे ही फक्त टक्केवारी व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहेत. त्याची कामे कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामध्ये पर्यावरण व शेतकऱ्यांचेच नुकसान होते. म्हणूनच जलसंधारणाबरोबरच पाण्याचे कायमस्वरूपी शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न केले नाहीत, तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही़
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री