एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 07:17 PM2018-10-13T19:17:37+5:302018-10-13T19:23:51+5:30
एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही.
लोणी काळभोर : एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन एमआयटी शिक्षण संस्थेचे मंगेश कराड यांनी दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एक जगविख्यात घुमट तयार करण्यात आला आहे.२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या घुमटाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत.मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सन्मान कृती समितीच्या माध्यमातून गेले काही दिवस हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतेक सर्व गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत होती. त्यानुसार आज महाराष्ट्र बॅकेपासून एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाच्या प्रारंभाच्या ठिकाणी येऊन मंगेश कराड यांनी मोर्चेकरी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा पुतळा बसवण्यात येईल.
.............
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. वातावरणात एक अनामिक तणाव होता. परंतु, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आपला अनुभव पणाला लावून परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली. त्या बद्दल ते दोघे व संपूर्ण पोलीस प्रशासन कौतुकास पात्र आहेत.