गुलाबपुष्प देऊन आंदोलनाला सुरुवात
By admin | Published: June 2, 2017 01:59 AM2017-06-02T01:59:24+5:302017-06-02T01:59:24+5:30
भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
राज्यात आजपर्यंत सर्वाधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर देतच नाही शिवाय कर्जमाफीही करत नसल्याने शेतकऱ्यांनी उभारलेल्या संपास शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गर्दे यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव भीमा आठवडे
बाजारमध्ये विक्रेते व शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शांततेच्या मार्गाने ‘शेतकरी संप’ आंदोलनास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प
देत दुकाने बंद करण्यास
सांगण्यात येत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सुहास काटे, लक्ष्मण रांजणे, शिरुर तालुकाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, बापुसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, चंद्रकांत धुमाळ, विशाल भुजबळ, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, किसन पलांडे, गणेश दौंडकर, सत्यवान धुमाळ उपस्थित होते.
शरद गर्दे म्हणाले, ‘१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील २० दूध डेअरी शांततेच्या मार्गाने बंद करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांची वेळ कधी येणार?
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची अजून वेळ आली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करण्यासाठी वेळ येणार तरी कधी, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गर्दे यांनी केली.