विकासासाठी संघाची वाटचाल महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2016 02:04 AM2016-10-10T02:04:58+5:302016-10-10T02:04:58+5:30
देशामध्ये तब्बल ६५ वर्षांनंतर वैचारिक परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम करायला हवे.
पुणे : देशामध्ये तब्बल ६५ वर्षांनंतर वैचारिक परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम करायला हवे. राष्ट्राला सर्वोच्च ठिकाणी नेण्यासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. तात्पुरता विजय पुरेसा नाही, तर चिरस्थायी विजय मिळवायला हवा, असे मत भाजपाचे राज्याचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागातर्फे विजयादशमीनिमित्त शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेत शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका, संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, कसबा भाग संघचालक किशोर शशितल, सहसंघचालक सुहास पवार आदी उपस्थित होते. घोष, योगासने व
अन्य प्रात्यिक्षके सादर करण्यात आली.
रांका म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक सदस्य देशासाठी आहे. संघाच्या अनेक सदस्यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे. सीमोल्लंघन करायचे असेल, तर प्रत्येकाने राष्ट्रासाठी आहुती देण्याकरिता तत्पर असले पाहिजे. हिंदू संस्कृती टिकवली तरच धर्म जागृती होईल. केवळ धर्मांतर रोखून उपयोग नाही.’’
चिंतामणी थत्ते यांनी सूत्रसंचालन केले. किशोर शशितल यांनी प्रास्ताविक केले. सुहास पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)