बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग
By श्रीकिशन काळे | Updated: January 21, 2025 16:04 IST2025-01-21T16:03:17+5:302025-01-21T16:04:12+5:30
नाट्यगृहांमध्ये ज्या वेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोगाला पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळतोय

बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग
पुणे : मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्याने ते प्रदर्शित होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी खास नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा प्रयोग पुण्यात सुरू झाला. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने आता बालगंधर्व रंगमंदिरात दोन दिवसीय चित्रपट महोत्सव आयोजिला आहे. तो दोनच दिवसांमध्ये हाऊसफुल्ल झाला आहे. रसिकांनी हजारोच्या संख्येने तिकिट बुकिंग केले.
नाट्यगृहांमध्ये ज्या वेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात गेल्या महिन्यात करण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिरात मराठी चित्रपटाच्या महोत्सवासाठी जागा दिली. बुधवार (दि.२२) आणि गुरूवारी (दि.२३) मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजिला आहे. केवळ एकोणपन्नास रूपयांत मराठी चित्रपट पाहता येणार आहे. त्यासाठी रसिकांनी बालगंधर्व रंगमंदिरात जाऊन तिकिट बुक केले. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन हजार रूपये खर्च करणे परवडत नसल्याने अनेकजण चित्रपटाला जात नाहीत. परंतु, त्यांना आता बालगंधर्व रंगमंदिरात अतिशय कमी दरात मराठी चित्रपट पाहता येणार आहे. म्हणून पहिल्या दिवशीचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.
रांग लावून काढले तिकिट !
नाट्यगृहात चित्रपट यशस्वी होईल की नाही, याविषयी शंका होती. पण चित्रपट महोत्सव घोषित झाल्यानंतर रांग लावून रसिकांनी तिकिटे काढली आहेत. पुणेकरांना हा प्रयोग आवडला असल्याचे यावरून दिसून येत आहे.
मराठी चित्रपट महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर येथे भरविण्यात आलेल्या सर्व चित्रपटांना भरघोस प्रतिसाद पुणेकरांच्या वतीने मिळत आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, हॅशटॅग तदेव लग्नम, यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून, हे तीनही चित्रपटांचे शो दोन दिवसातले हाऊसफुल झालेले आहेत, प्रेक्षक रांग लावून 49 रुपयाचे तिकीट घेत आहेत. - बाबासाहेब पाटील, प्रदेश अध्यक्ष, मराठी चित्रपट असोसिएशन