फिरत्या प्रसूती व्हॅनची महापालिकेतर्फे सुविधा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:23 AM2018-08-26T02:23:28+5:302018-08-26T02:23:50+5:30
महिला व बालकल्याण समितीची मान्यता
पुणे : शहराच्या प्रत्येक भागात सध्या महापालिकेच्या हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पोहचण्यास उशीर झाल्याने रस्त्यात, रिक्षा, बस, गाडीमध्ये प्रसूती झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सुसज्ज प्रसूती व्हॅन खरेदी करण्यास शुक्रवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मान्यता दिली, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली.
नवले यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत प्रचंड मोठी वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणात हद्दवाढ झाली आहे. परंतु त्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या नसून, अनेक भागात महापालिकेचे हॉस्पिटल, रुग्णालये नाहीत. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात सध्या महापालिकेचे हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वेळा गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाल्याने रस्त्यात, रिक्षा, बस, गाडीमध्ये प्रसूती झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसूती व्हॅनची सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे नवले यांनी स्पष्ट केले. यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात तातडीने तरतूद करून लवकरच या व्हॅन उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.