खासदार केले... आमदार केले.. तरी विकास होईना
By admin | Published: June 28, 2017 03:53 AM2017-06-28T03:53:54+5:302017-06-28T03:53:54+5:30
शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष होते. या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात विकास होत नाही.
बारामती : शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष होते. या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात विकास होत नाही. त्यामुळे अतिक्रमणे होतात. मागील १५ ते २० वर्षांपासून विकासकामांपासून दुर्लक्षित असलेल्या कसबा भागातील अण्णा भाऊ साठेनगरमधील रहिवाशांनी फ्लेक्स बोर्ड लावून थेट ‘विठ्ठला’ला साकडे घातले आहे. ‘खासदारकीला केले... आमदारकीला केले... नगराध्यक्ष, नगरसेवकांनादेखील मतदान केले; तरीपण विठ्ठला... पांडुरंगा... २० वर्षांपासून आमचा विकास झालाच नाही,’ असा बोर्ड लावल्याने येथील नागरी समस्यांवर पुन्हा प्रकाशझोत टाकला आहे.
रस्त्याच्या कामाकडे
ठेकेदाराचे दुर्लक्ष
नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत झोपडपट्टी पुनर्वसन होणार आहे.; त्यामुळे चांगली घरे मिळतील, असे आश्वासन दिले जाते. पुढे मात्र काहीच होत नाही. साधारणत: चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात सर्वच सुविधांची वानवा आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. पूर्वीच्या गृहनिर्माण सोसायटीच्या जागांवर अतिक्रमण वाढले. वस्तीतून जाणारा रस्ता पूर्वी २७ फुटांचा होता. आता १० फूटच राहिला आहे. निवडणुकीपूर्वी अंतर्गत गल्लीबोळांचे क्राँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदार डी. एस. पवार यांना दिले होते. त्यांनी अर्धवट काम सोडून दिले आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामदेखील त्यांनाच दिले आहे. कामाची वर्कआॅर्डर दिली; मात्र अगोदरच्या कामाचे बिल नगरपालिकेने दिले नाही म्हणून त्यांनी कामच केले नाही. त्यामुळे साठेनगरसारख्या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तरी काम केले नसल्याची तक्रार आहे.
विकासकामांसाठी ठेकेदार
पुढे येत नाहीत.
या परिसरात असणाऱ्या समाज मंदिराच्या परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. समाज मंदिराचा भाग मोकळा होता तेव्हापासून आतापर्यंत ७ वेळा समाज मंदिर बांधण्यासाठी टेंडर निविदा काढल्या; परंतु ठेकेदारच आले नाहीत. हीच स्थिती या भागातील स्वच्छतागृहाची आहे. सतत स्वच्छतागृह तुंबते. त्यामुळे महिलांसह सर्वच नागरिकांची गैरसोय होते. पाण्याची सोय नाही. दरवाजे तुटले आहेत. कमालीच्या घाणीचे साम्राज्य स्वच्छतागृहांमध्ये आहे. स्वच्छतागृहासाठीदेखील ठेकेदार पुढे येत नाही. तीन वेळा यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली आहे. स्वच्छतागृहाला कधी मुहूर्त लागणार, याची कोणालाच खात्री नाही. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. कामाचे आदेश ठेकेदार पवार यांना दिले. त्यांनी मात्र कामच सुरू केले नाही. ‘आमचा प्रभाग स्वच्छ प्रभाग’ अशाी आरोळी सोशल मीडियावर ठोकणाऱ्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनीदेखील या कामाकडे आतापर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, अशी येथील तरुण कार्यकर्त्यांची भावना आहे.
दारू, मटका, जुगाराच्या अड्ड्यांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडले
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, गल्लीबोळांत सांडपाणी जाण्यासाठी सुविधा नसल्याने झालेली दलदल. दलदलीमुळे कमालीचा उग्र वास येतो. त्यातच बेकायदेशीर दारू, मटक्यासह अवैध धंदे या परिसरात फोफावले आहेत. जुगाराचे अड्डेदेखील वाढलेले आहेत. दारूच्या धंद्यांमुळे महिलांना जास्त त्रास होतो. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. यावरदेखील प्रतिबंध आणला जावा, अशी मागणी होत आहे. काही सुशिक्षित तरुणांनी याबाबत अनेकदा लेखी निवेदने दिली. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.