खासदार मेनका गांधींचा फोन आला अन् पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 06:09 PM2020-12-15T18:09:46+5:302020-12-15T18:14:52+5:30
भटक्या श्वानाला ठार मारल्याचे प्रकरण
पिंपरी : भटक्या श्वानाला इमारतीवरून फेकून ठार मारल्याची घटना पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि.१२) घडली. याबाबत माहिती मिळताच खासदार मेनका गांधी यांनी सांगवी पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले.
याप्रकरणी फरीनजहाँ विशाल शेख (वय २३, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सात महिने वय असलेल्या एका भटक्या श्वानाला सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे एका इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकून दिले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अमानवीयतेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राणीमित्र तसेच इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी फिर्यादी शेख यांच्याशी संपर्क साधला. तसेच याबाबत खासदार मेनका गांधी यांना माहिती दिली. त्यानंतर खासदार गांधी यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
खासदार मेनका गांधी यांनी फोनवरून श्वानाच्या मृत्यूप्रकरणी माहिती घेतली. योग्य तपास करून आरोपींवर कारवाईबाबत त्यांनी सूचना केली. याप्रकरणात एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न होत आहे.
- अजय भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सांगवी