खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:21 PM2024-06-14T12:21:19+5:302024-06-14T12:24:43+5:30
खासदार गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातायेत
पुणे : खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याचे समोर आले आहे. लंके यांनी मारणेकडून शाल आणि श्रीफळ स्वीकारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. नवनिर्वाचित अशा प्रकारे खासदार गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर ते काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यावेळी मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गजा मारणेच्या भेटीनंतर लंकेंवर टीकाटिपणी देखील होऊ लागलीये. भेट घेण्याचं कारण लंके यांनी सांगावं याबाबत राजकीय वर्तुळातून विचारणा होत आहे.
खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..#pune#nileshlanke#gajananmarnepic.twitter.com/NrUOtjfEIT
— Lokmat (@lokmat) June 14, 2024
गजा मारणेवर वर याआधी देखील खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यांमधून त्याची सुटका झाली. त्याची सुटका झाल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यंतरी गजा मारणेच्या बायकोने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षाने संधी दिली तर आम्ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया मारणेने दिली होती.