पाणीप्रश्नावर कंटाळून पुण्याचे खासदारच बसणार उपोषणाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:02 AM2018-10-27T01:02:43+5:302018-10-27T01:02:50+5:30
पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचेच अनेक नगरसेवक पाण्याच्या तक्रारी करत आहेत. आमदारही हैराण झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी उपोषणाचा इशारा दिल्याने पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे.
पुणे- शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी अखेर खासदार अनिल शिरोळेच महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिरोळे यांच्याकडे अनेक दिवसांपासून नागरिक तक्रारी करत होते. तेदेखील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी बोलत होते. परंतु, तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही.
शिरोळे म्हणाले, की पुणे शहरातील प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी यासारख्या मध्यवर्ती भागांमध्येसुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात हे आश्चर्यजनक आहे. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे. सध्यातरी असे चित्र शहरात दिसत नाही. प्रत्येक घरातील महिलेची पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत मी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोनवरून बोललो. त्यांना पत्रही दिले. त्यांनी पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन फोनवरून मला दिले. महापौर मुक्ता टिळक यांच्याशीही चर्चा केली. मात्र, त्यानंतर पाण्याच्या तक्रारींबाबत वाढच झाली. आज तर त्याचा कहरच झाला. मॉडेल कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ ते १० हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक होते. मात्र, आज तेथे पाणी आलेच नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महापालिका पाणीच देऊन शकणार नसेल तर उपयोग काय? त्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.