खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:52+5:302021-05-01T04:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उपचारांना ते योग्य प्रतिसाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उपचारांना ते योग्य प्रतिसाद देत असून त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही वाढ होत आहे, अशी माहिती जहांगीर रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यजीतसिंग गील यांंनी दिली.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. उपचारासाठी म्हणून सातव यांना कुठेही हलविणार नसून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, असे कदम यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाधित झाल्याने सातव यांंना २५ एप्रिलला जहांगीर रुग्णालयात दाखल केले आहे. विश्वजीत कदम यांनी आज दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी सातव यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. सातव यांच्यावर औषधौपचार सुरू आहेत. रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचा प्रतिसाद चांगला येत असून अपेक्षित सुधारणाही दिसत आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईत किंवा इतरत्र कुठेही हलविणार नाही, असे कदम यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सत्यजीतसिंग गील यांनीही सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची कमी झालेली ऑक्सिजन पातळी आता वाढत असल्याचे स्पष्ट केले.
शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जहांगीरमध्ये जाऊन सातव यांच्या तब्बेतीची माहिती घेतली. डॉक्टर गील यांचीही त्यांंनी भेट घेतली व सातव यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. सातव अजूनही अतीदक्षता विभागात आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा कार्यरत होतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.