खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:33 AM2024-06-07T10:33:32+5:302024-06-07T10:35:23+5:30

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत...

MP Sir; NDA hill in Kothrud area, don't ignore BDP murlidhar mohol pune | खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोथरूड परिसरातील जिजाईनगर भागातील एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बायो-डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनेक मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. या सगळ्याचा परिसराच्या आणि एकूणच पुणे शहराच्या पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे, यासंदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पुणे महापालिकेचे आजी आणि माजी आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. वारंवार तक्रारीनंतरही हे प्रकार थांबले नाहीत. उलट बांधकामे वाढली. त्यावर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिजाईनगर कोथरूड रहिवासी संघाने दिला आहे.

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत. या इमारती अनधिकृत असूनही पाणीपुरवठा व वीजजोडणी देण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात पालिकेचे पाणी बांधकामासाठी वापरून प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करण्यात आला आहे. कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई न केल्यामुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहनच मिळत आहे. हे सर्व मागील दीड वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरू असून, महापालिका प्रशासनाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बीडीपी संकल्पनेचाच पूर्णपणे बोजवारा उडाला असून हा परिसर अत्यंत विद्रूप बनत चालला आहे. हे सर्व कोणाच्या ‘आशीर्वादा’ने होत आहे, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रकार त्वरित थांबवावा आणि उभी राहिलेली अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून बीडीपी क्षेत्राचे आणि पुण्याच्या पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यापूर्वी आंबेगाव, बावधन, खराडी अशा अनेक भागांत बहुमजली अनधिकृत बांधकामे पुणे महानगरपालिकेकडून पाडण्यात आली आहेत; पण कोथरूड भागाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे. पुण्याच्या नवनिर्वाचित लोकसभा खासदारांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: MP Sir; NDA hill in Kothrud area, don't ignore BDP murlidhar mohol pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.