खासदार सुळे यांच्या पुढाकारातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:50+5:302021-09-22T04:11:50+5:30
बारामती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त ...
बारामती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून आज पुण्यात दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा पार पडला.
मेळाव्यात सहभागी झालेल्या सुमारे पाचशे तरुण-तरुणींपैकी सहा जोडप्यांचे विवाह निश्चित झाले. आगामी काळात ही सर्व माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात येणार असून, त्याद्वारे आज आलेल्या सर्व तरुण-तरुणींना माहिती पाठविण्यात येणार आहे. त्यायोगे आणखी जेवढे विवाह निश्चित होतील, त्या सर्वांचे विवाह येत्या डिसेंबर महिन्यात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबर रोजी बारामती येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह लावून देण्यात येणार आहेत. याचा संपूर्ण खर्च खासदार सुप्रिया सुळे या स्वत: करणार आहेत.
या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ समाजसेविका नसिमा हुर्जूक यांनी भेट दिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राचे नंदकुमार फुले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अशोक सोळंके, दीपिका शेरखाने, सुकेशिणी मर्चंडे, विष्णू वैरागकर, बाळासाहेब जगताप, अमेय अग्रवाल, सागर कान्हेकर, दिव्यांग कार्यकर्ते भाग्यश्री मोरे, मिनीता पाटील, दत्तात्रय भोसले, अभय पवार आदींनी काम पाहिले. कान्हेकर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. शेरखाने आणि रमेश बागले यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या कर्णबधिर प्रतिनिधींसाठी तेजस्विनी तळगूळकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले.
————————————————