'त्या' आल्या, त्यांनी पाहिलं अन् त्या गेल्या...; स्थानिकांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणावरच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:22 PM2023-08-26T13:22:31+5:302023-08-26T13:27:17+5:30
स्वामीनारायण पूल ते वारजे एलेव्हेट पूल होणार...
- कल्याणराव आवताडे
धायरी : नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. पाच मिनिटांत आढावा घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तोही राजकीय विषयांवर अन् चालल्या गेल्या. मात्र उपस्थित असणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले.
शुक्रवारी नवले पूल परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. मोजून पाच मिनिटे त्यांनी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली. यावेळी उपस्थित असणाऱ्या माध्यमांशी त्यांनी नवले पूल परिसरात घडणाऱ्या अपघातापेक्षा राजकारणावर जास्त वेळ माध्यमांशी संवाद साधला. ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित झालेल्या या परिसरात खासदार आल्यानंतर त्यांनी सविस्तर पद्धतीने यावर चर्चा करणे अपेक्षित होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून याबाबत काहीतरी ठोस आश्वासन मिळेल या आशेने अनेक स्थानिक नागरिक याठिकाणी उपस्थित होते. मात्र खासदारांनी यावर कमी चर्चा करून उपस्थित असलेल्या माध्यमांशी चालू असलेल्या राजकारणावर जास्त संवाद साधल्याने स्थानिक नागरिकांचा हिरमोड झाला.
स्वामीनारायण पूल ते वारजे एलेव्हेट पूल होणार...
नवले पूल परिसरात वारंवार अपघात होत असल्याने तसेच सतत वाहतूक कोंडी होत असल्याने याठिकाणी स्वामीनारायण पूल ते वारजे असा थेट एलेव्हेट पूल करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आली. तसेच यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महामार्गापासून जवळच आमची घरे आहेत. अपघात रोखण्यासाठी महामार्गावर रंबलर्स बसविण्यात आले आहेत. एखादे मोठे अवजड वाहन यावरून गेल्यास खूप मोठा आवाज येतो. रात्री या आवाजामुळे झोप लागत नाही. यावर काहीतरी उपाययोजना करण्यास ते अधिकाऱ्यांना सांगतील असे वाटले. परंतु आमची निराशा झाली.
- एक स्थानिक नागरिक, नऱ्हे
नवले पूल परिसरात शून्य अपघात होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. याठिकाणी असणारे सर्व्हिस रस्ते पूर्ण झाले नाहीत. याची कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
- सुप्रिया सुळे, खासदार