खासदार सुळेंच्याविरोधात ‘मिसेस कुल’? भाजपा-रासपाकडून संभाव्य नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:37 AM2018-11-08T01:37:31+5:302018-11-08T01:37:57+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

MPs' protest against mines? Possible name by BJP-RSP | खासदार सुळेंच्याविरोधात ‘मिसेस कुल’? भाजपा-रासपाकडून संभाव्य नाव

खासदार सुळेंच्याविरोधात ‘मिसेस कुल’? भाजपा-रासपाकडून संभाव्य नाव

Next

यवत : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी करून मोठा शह पंतप्रधान नरेंद्र मोदी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वाची भूमिका निभावत असताना त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे ८० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या होत्या. सुळे यांचे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. सध्या जानकर राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पण जानकर यांनी मागील निवडणुकीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिजे तेवढा संपर्क ठेवलेला नाही. यामुळे त्यांच्याविषयी अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचमुळे भाजपा आता येथील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

बाहेरच्या उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवार सुळे यांच्याविरोधात देण्यासाठी भाजपा विचार करीत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची बारामती लोकसभेसाठी चर्चा आहे. सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी बारामती तालुक्याची लेक व दौंडच्या सूनबाई अशी दुहेरी ओळख असलेल्या ‘मिसेस कुल’ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर असून त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकदेखील आहेत.

आमदार कुल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष सलगी आहे. त्यामुळेच भीमा पाटस कारखान्याला विशेष पॅकेज मिळाले आहे. आमदार संग्राम थोपटे आणि कुल यांची मैत्री सर्वश्रुत आहेच. खडकवासला मतदारसंघात भाजपाचे भीमराव तापकीर आमदार आहेत. भाजपा सेना युती झाल्यास राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे सहकार्य व इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्यावरील नाराजीचा फायदा कुल यांना मिळू शकतो. शिवाय कुल यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केल्याने त्यांना मानणारा वर्गही त्या पक्षात आहे.

अर्थात, गेल्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यामुळे सध्या खासदार सुळे येत्या निवडणुकीसाठी जोरदारपणे कामाला लागल्या आहेत. गावदौऱ्यांच्या माध्यमातून गाव न् गाव पिंजून काढले आहे. गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात निवडणुकीलाअजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. भाजपा शिवसेनेत युती होते की नाही? पुढे कशा घडामोडी घडतात, यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत.

Web Title: MPs' protest against mines? Possible name by BJP-RSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.