पुण्याची ‘खासदारकी’! जागा मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:21 AM2018-11-13T02:21:49+5:302018-11-13T02:22:13+5:30
शहरात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. पुण्याची खासदारकी मिळविण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर भाजपामध्ये उमेदवार कोण, यावर खलबते सुरू आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागेल आहेत. सध्या पुण्याची खासदारकी मिळविण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत. देशात आणि राज्याच्या राजकारणामध्ये पक्षाचा दबदबा निर्माण करण्यासाठी हक्काच्या जागांवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुण्याची जागा मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुण्यात आमचे मित्र पक्ष काँगे्रसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे. काँग्रेसपेक्षा नगरसेवकांची संख्यादेखील चौपट आहे. त्यामुळे पुण्याची खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.
पुणे जिल्ह्यात काँगे्रसचे अस्तित्व पुसून टाकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून, कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा अन्य कोणालाही सोडायची नाही, अशी भूमिका राज्य आणि पुण्यातील काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे. यासाठी पुण्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत शहरातील काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले होते. पुणे लोकसभा ही काँगे्रसचीच जागा आहे. शहरात काँगे्रसला मानणारा पारंपरिक मोठा मतदार आहे. काँगे्रसचे शहराशी भावनिक नाते आहे. त्यामुळे पुण्याची जागा काँगे्रसचीच असून, ती आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा आग्रह या वेळी सर्वच नेत्यांनी धरला. सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पुण्याच्या जागेसाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरण्याचा व जो उमेदवार देतील त्याचे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या तरी पुण्याच्या जागेवरून काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या पुण्यात भाजपाचे अनिल शिरोळे खासदार असून, आगामी निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये राज्यसभेतील भाजपाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी जाहीरपणे पुण्याची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता मिळविण्यात काकडे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहरासाठी अधिक काम करणे, पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला ही उमेदवारी मिळावी, असा दावा काकडे यांनी केला आहे. तर विद्यमान खासदार अनिल शिरोळे हेदेखील पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु यामध्ये स्वत: पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले हेदेखील पुण्याच्या खासदारकीसाठी इच्छुक असल्याने भाजपामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदी सरकार आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात प्रामुख्याने काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी होणार हे नक्की झाले आहे़ पुण्याच्या जागेबाबत चर्चा सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे़ काँग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे, अनंत गाडगीळ, उल्हास पवार, अॅड़ अभय छाजेड हे इच्छुक आहेत़
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसला आघाडी करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत जायचे की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची याबाबत शिवसेनेचा निर्णय झालेला नाही. परंतु आघाडी, युतीबाबत येत्या काही दिवसांत जोरदार हालचाली सुरू होतील. यामध्ये पुण्याची खासदारकी नक्की कोणाला मिळणार, हे स्पष्ट होईलच, पण पुणेकरांचे प्रश्न, समस्या सोडविणारा उमेदवार मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. यासाठी पुण्याची, येथील समस्यांची जाण असणारा, हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार मिळावा ही सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा असेल, हे मात्र नक्की.
-सुषमा नेहरकर-शिंदे