MPSC पूर्व परीक्षेच्या १ लाख हॉल तिकिटांचा डेटा लिक; विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती हॅक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 01:50 PM2023-04-23T13:50:46+5:302023-04-23T13:52:06+5:30
MPSC EXAM: ३० एप्रिल रोजी MPSCची पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती सोशल मीडियावर व्हायरला झाली आहे.
पुणे: MPSC पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. टेलिग्राम या अॅपवर लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती तसेच त्यांचे प्रवेशपत्र असा डेटा लिक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार या टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेऊन यावर खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेलिग्राम चॅनलवर सुमारे १ लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. तसेच आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी ... आणि बरेच काही आहे. याशिवाय, पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा मोठा दावा या चॅनलवर करण्यात आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेत, या सगळ्यावर खुलासा जारी केला आहे.
प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक ट्विट करण्यात आले असून, यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.
२. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
३. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
४. प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सविस्तर ट्विट पाहण्यासाठी क्लिक करा.
दरम्यान, ३० एप्रिल रोजी MPSCची संयुक्त परीक्षा होणार आहे. मात्र, या व्हायरल झालेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. अशा पद्धतीने माहिती लिक होणे हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"