MPSC Exam | 'एमपीएससी'ची संयुक्त पूर्व परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:09 PM2022-06-07T20:09:52+5:302022-06-07T20:11:57+5:30
आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रचंड मनस्ताप....
पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), विक्री कर निरीक्षक (एसटीआय) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) साठी पूर्व परीक्षा घेतली होती. या परीक्षांचा अंतिम निकाल २ जून २०२२ ला जाहीर झाला आहे. मात्र, या निकालात बहुतांश विद्यार्थ्यांना जाहिर झालेल्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण असून देखील त्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट केलेली नाहीत. विद्यार्थ्यांनी आयोगाला याबाबत अर्ज दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ‘मॅट’चा दरवाजा ठोठावण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे.
संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. मात्र, आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करावी की न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्यात असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी नाराजी व्यक्त करत अक्कलकोटचा विद्यार्थी समर्थ लोंढे याने सांगितले, की आयोगाने लवकरात लवकर या अर्जाची पडताळणी करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांसमोर न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाशिवाय पर्याय नाही.
राज्यातील आतापर्यंत २८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेतील बाबींकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे. मुबंईतील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज तसेच ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. अर्जासोबत पुरावा म्हणून ओएमआरची कार्बन कॉपी आणि प्रवेश पत्र (हॉल तिकीट) जोडले. परंतु, ५ दिवस उलटून गेले तरी आयोगाकडून विद्यार्थ्यांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आणखी एक दिवस वाट पाहून विद्यार्थी मॅट मध्ये जाण्याच्या तयारीत आहे, असे विद्यार्थी ऋषिकेश काळे याने सांगितले.
आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला कट ऑफ
* पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) : ४८.२५
* विक्री कर निरीक्षक (एसटीआय) : ४६.५०
* असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) : ५३.७५
मला ईडब्लूएस खेळाडू या प्रवर्गातून ३५.५० गुण मिळाले असून विक्री कर निरीक्षकचा कट ऑफ २२ तर पोलीस उपनिरीक्षकसाठी २५.५० लागला आहे. मात्र, तरी देखील माझे अंतिम यादीमध्ये माझे नाव नाही. मी आयोगाला सर्व पुरावे सादर केले आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच निर्णय दिला नाही.
- समर्थ लोंढे, विद्यार्थी, अक्कलकोट
मी खुला/ईडब्लूएस या प्रवर्गातून ४८.७५ गुण मिळूनदेखील माझे पोलीस उपनिरीक्षक/विक्री कर निरीक्षकच्या मेरीट लिस्टमध्ये नाव नाही.
- ऋषिकेश काळे, विद्यार्थी, पुणे