एमपीएससी परीक्षा पुढे ढकला हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:11+5:302021-04-06T04:10:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोनलन करणारे ...

MPSC exam postponed! | एमपीएससी परीक्षा पुढे ढकला हो!

एमपीएससी परीक्षा पुढे ढकला हो!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोनलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने १४ मार्च २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले. एमपीएससीची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या ११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करीत असलेल्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या नंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.

---

मला कोरोना झाला आहे. सौम्य लक्षणे असली तरी खबरदारी म्हणून मी पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालो आहे. येत्या बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात येईल. येत्या अकरा तारखेची परीक्षा चुकू नये म्हणून, अनेकजण दुखणे अंगावर काढत आहेत. त्यामुळे परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या महिन्यातील स्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे सरकारने परीक्षा पुढे ढकलावी.

- महेश घरबुडे, एमपीएससी परीक्षार्थी

----

गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करीत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलावी असे वाटते. अनेक परीक्षार्थी बाधित आहेत. परीक्षा चुकू नये यासाठी अंगावर दुखणे काढत आहेत. तसेच अभ्यासिकेत जाऊन अभ्यासही करीत आहेत. त्यामुळे किमान महिनाभर तरी परीक्षा पुढे ढकलावी. गेल्या वेळेस परीक्षेवरून राजकारण झाले. तसे आता होऊ नये.

- रक्षित मेश्राम, एमपीएससी परीक्षार्थी, नागपूर विभाग

----

परीक्षा पुढे ढकलावी की नाही याबाबत टेलीग्रामवर परीक्षार्थीचे मत आजमविण्यात आले. सुमारे आठ हजार जणांनी आपले मत नोंदविले. त्यातील ५१ टक्के जणांनी परीक्षा पुढे ढकलू नये अशी भूमिका घेतली. तर, ४९ टक्के जणांनी परीक्षा पुढे ढकलावी असे सांगितले. जवळपास दोन वर्षांनी परीक्षा होत आहे. त्यामुळे परीक्षा ढकलू नये असे एक मत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक जण अंगावर दुखणे काढत आहेत. परीक्षेच्या तोंडावर कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास परीक्षेला मुकावे लागेल अशी भीती अनेकांना आहे. परिक्षार्थीच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नये असे दुसरे मत आहे. सरकारनेच त्यावर आता योग्य तो निर्णय घ्यावा.

- राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती

Web Title: MPSC exam postponed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.