MPSC: पुण्यात परीक्षार्थींचे आंदोलन; नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 03:08 PM2023-02-20T15:08:51+5:302023-02-20T15:09:18+5:30
आज पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलन करत आहेत....
पुणे : २०२३ पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थींनी 2023 पासून होणारी वर्णनात्मक परीक्षा रद्द करून ती पद्धत २०२५ पासून लागू करावी अशी मागणी केली होती. यासाठी परीक्षार्थींनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आज पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलन करत आहेत.
मागील आंदोलनात मागणीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांनी फोनवरून संवादही साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत विषय मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. पण अजूनही राज्यसेवा आयोगाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढलेले नाही.
बैठक झाली पण परिपत्रक नाही-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यसेवा आयोगाची बैठकही काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यानंतर परीक्षेबद्दलचे परिपत्रक येणे अपेक्षित होते. पण अजून आयोगाने परिपत्रक काढले नसल्याने परीक्षार्थींनी पुण्यात जेएम रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदीर सभागृहाजवळ आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी भेट दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेही या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जात आहे.
MPSC : पुण्यात परीक्षार्थींचे आंदोलन; राज्यसेवा मुख्य परीक्षेचे नवीन बदल २०२५ पासून लागू करण्याची मागणी#mpscpic.twitter.com/p6DoENUY98
— Lokmat (@lokmat) February 20, 2023