MPSC: आयोगाने घातले परीक्षार्थींच्या बोलण्यावर निर्बंध; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:33 PM2021-12-30T18:33:13+5:302021-12-30T18:42:41+5:30
परीक्षार्थी विविध समाजमाध्यमांवर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक आयोगाने काढले आहे
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc) आयोजित परीक्षा आणि निकालासंदर्भात समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाची आता नजर असणार आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आयोगाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण इत्यादिसंदर्भात आयोगाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. pic.twitter.com/GC2tq4YzfJ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 30, 2021
या परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी विविध सोशल मीडियावर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक काढले असल्याचे आयोगाने या परिपत्रकात नमूद केले आहे. तर आयोगाने हे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणल्याची भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया-
१. आदर कर्तुत्वातून कमवावा लागतो. तो असा धमकावून मिळत नाही. अशी हुकूमशाही भाषा वापरून विद्यार्थ्यांना धमकावणे बंद करावे. कोणाचे नुकसान करण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका.
२. आत्मपरीक्षण. तुकाराम महाराज असे म्हणतात की "निंदकाचे घर असावे शेजारी"!
३. आयोगाला टीका सहन होत नाही आता. नवलच आहे बाबा
४. उमेदवारांच्या मनात चीड उत्पन्न करणारी कृती आयोगानेही करू नये. आपण घटनात्मक संस्था आहात आपण आपल्या दर्जानुसार काम करायला हवे. उत्तरतालिक जाहीर करता वेळी आयोगानेही पूर्ण अभ्यास करून जाहीर करावी व upsc कडून काही शिकावे
५. सन्माननीय आयोगाने विद्यार्थ्यांच्या उचित मागण्यांचा साकल्याने विचार करावा. मागील काही दिवसापासून आयोगामार्फत वारंवार सदोष प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन नंतर ती दुरुस्त का करावी लागतात याचादेखील आयोगाने विचार करावा. आयोगाच्या स्वायत्ततेची विद्यार्थ्यांना पूर्ण जाणीव आहे.