एमपीएससी अडकली वेळापत्रकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:21+5:302021-09-02T04:21:21+5:30

यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) दर वर्षी वार्षिक वेळापत्रक घोषित करून त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करते, तीच अपेक्षा राज्यातील विद्यार्थ्यांना ...

MPSC stuck in schedule | एमपीएससी अडकली वेळापत्रकात

एमपीएससी अडकली वेळापत्रकात

googlenewsNext

यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) दर वर्षी वार्षिक वेळापत्रक घोषित करून त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करते, तीच अपेक्षा राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससीकडून आहे. त्यामुळे एमपीएससीने त्वरित वेळापत्रक जाहीर करावे.

-------------------------------------------

राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करण्यात यावी. या आशयाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) पाठविले जाते. मागणी पत्र पाठविण्यापूर्वी १५ ऑगस्ट पूर्वी रिक्त पदांची माहिती शासनाला कळवावी, असे आदेश

उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र ३० सप्टेंबरपूर्वी सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती सादर करावी, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार ती माहिती एमपीएससीकडे पाठवून परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाईल. या प्रक्रियेमध्ये किती वेळ जाऊ शकतो हे आधीच्या अनुभवानुसार सांगता येत नाही. त्यामुळे किमान वेळापत्रक तरी जाहीर करावे. अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांची आहे.

गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी, तसेच सरळ सेवा भरती प्रक्रिया झाली नाही. जी भरती झाली ती आरक्षणाचा प्रश्न, न्यायालयात सुरू झालेले दावे, तसेच इतर कारणांमुळे रखडली आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असल्याने सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विचार करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच राज्य सरकारने विविध विभागातील रिक्त जागांची माहिती घेऊन भरती करण्यासाठी मागणीपत्र एमपीएससीला पाठवावी. जेणेकरून तरुणांमध्ये आलेली मरगळ दूर होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. एकूणच भरती प्रक्रियेला झालेल्या दिरंगाईमुळे मराठा समाजासह इतर समाजातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात २१ ते ३० या वयोगटांतील तरुणपिढी अडकलेली आहे. सामाजिक अडचण, आर्थिक नुकसान, नैराश्य, मानसिक तणाव या व आदी गोष्टींचा तरुण सामना करीत आहे. तसेच कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. जर पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले तर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. तसेच नोकरीची आस लावून बसलेल्यांना दिलासा मिळेल.

स्पर्धा परीक्षाचे वेळापत्रक घोषित न होणे, तसेच रखडलेल्या सरळसेवा परीक्षा न होणे, रखडलेले निकाल घोषित न होणे या सर्व गोष्टीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये भविष्याबाबत अंधकार निर्माण झाला आहे. भविष्यात काय करायचं आहे, याचे कोणतेही नियोजन या विद्यार्थ्यांना करता येत नाही. या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या व्यवस्थेतून अंदाजे जवळपास ४-५ लाख कामगारांचे भविष्य अडचणीत आले आहे. तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विविध पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यास वेळेचे योग्य नियोजन करता येईल. महाराष्ट्र सरकार दिवसेंदिवस कमी पदभरती करत आहे, त्यामुळे निश्चित वेळापत्रक घोषित केल्यास रेल्वे, बँकिंग, एसएससी आदी परीक्षांची तयारी करण्यास महाराष्ट्रीय परीक्षार्थींना संधी मिळू शकेल.

यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) दर वर्षी वार्षिक वेळापत्रक घोषित करून त्यांची उत्तमप्रकारे अंमलबजावणी करते, तीच अपेक्षा राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससीकडून आहे.

गेल्या काही काळात एमपीएससीने विविध सुधारणा घडवून आणल्या आहेत. वार्षिक वेळापत्रक घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत सुरू करून उमेदवारांना स्पर्धा परीक्षांच्या मायाजालातून लवकर मुक्त होण्यास मदत करावी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अधिकतर उमेदवार खेड्यातील शेतकरी, कामकरी परिवाराची पार्श्वभूमी असणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवतींना तयारी करण्यासाठी परिवाराकडून खूप कमी काळ मिळतो. अशा मुलींना सरकारी पद मिळवण्यात वार्षिक वेळापत्रकाचा फायदा होईल आणि प्रशासनात महिलांचा टक्का वाढू शकतो. यामुळे आता सरकारने गाफील न राहता वेळापत्रक जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

- अमोल अवचिते

------------------

फोटो - एमपीएससी - १

Web Title: MPSC stuck in schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.