एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा शासनाविरोधात ‘एल्गार’ ;सोशल मिडियावर चालवणार मोहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:20 PM2020-02-22T15:20:55+5:302020-02-22T15:28:51+5:30
राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे.
पुणे: राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे. तसेच येत्या २ मार्च रोजी पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभाग स्तरावर भरती घेण्याचा निर्णय अध्यादेशाद्वारे जाहीर केला. मात्र, विभागस्तरावर ऑनलाईन परीक्षा घेऊन सुद्धा त्यात महापरीक्षा पोर्टलसारखाच गैरप्रकार होणार आहे.तसेच सध्या राज्यात ऑनलाईन परीक्षांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे एका पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. तसेच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासही बराच वेळ जातो. त्यात ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन परीक्षा बंद करून सर्व परीक्षा या लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी केली आहे.
शासनाने एमपीएससीला अधिक सक्षम करून सर्व परीक्षा एमपीएससीकडूनच घ्याव्यात,अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशातून महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले किंवा नाही. हे स्पष्टपणे समजत नसल्यामुळे सुरूवातीला विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.परंतु, शासनाने ऑनलाईन पध्दतीने व विभाग स्तरावर परीक्षा घेतल्या जातील,असे नुकतेच स्पष्ट केले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाविरोधात येत्या २ मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यंमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे ऑफलाईन पध्दतीनेच घ्याव्यात,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
महेश बढे, एमपीएससी स्टुडेटस् राईटस् :
सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे घेतल्या जाव्यात, या एकमुखी मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विद्यार्थीट्विटर वरून #onlyMPSC ही मोहिम सुरू केली जाणार आहे. तसेच सर्व आमदार व खासदारांना याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे. त्यांनी अधिवेशनात या विषयावर लाक्षणिक प्रश्न उपस्थित करावा,अशी विनंती लोकप्रतिनिधींना केली जाणार आहे. सर्व परीक्षा एमपीएससीकडून घेण्याचे शासनाने येत्या १ मार्चपर्यंत जाहीर न केल्यास २ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.
किरण निंभोरे,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा :
महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभागस्तरावर परीक्षा घेण्याचे निश्चित केले.मात्र,त्यामुळे अधिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.एमपीएससीकडून घेतल्या जाणा-या परीक्षेत अधिक पारदर्शकता आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात.
माधव कल्लाळे, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा :
शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणा-या परीक्षा अधिक वेळ चालतात.तसेच ऑनलाईन परीक्षेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.एमपीएससीकडून पारदर्शकपणे व जलद गतीने परीक्षा होतात.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीने घेणे गरजेचे आहे.
नागेश भालेराव, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा :
एमपीएससी एवढी पारदर्शकता कुठेही नाही.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात.महापरीक्षा पोर्टल बंद करून विभागवार परीक्षा घेवून भरती करण्याचा निर्णय योग्य नाही. ऑनलाईन परीक्षांना अधिक वेळ जातो.तर ऑफलाईन परीक्षा लवकर होतात.त्यामुळे शासनाने आपल्या पुनर्विचार करावा.