MPSC ने मुख्य परीक्षा ऑफलाइन घ्यावी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:22 AM2023-04-25T09:22:41+5:302023-04-25T09:24:17+5:30
एमपीएससीच्या उमेदवारांची हजाराे प्रवेशपत्रे लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन माध्यमातून घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत...
पुणे : राज्य सेवा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ मुख्य परीक्षा या ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहेत. एमपीएससीच्या उमेदवारांची हजाराे प्रवेशपत्रे लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन माध्यमातून घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
आयाेगाकडे अत्याधुनिक सायबर सुरक्षा यंत्रणा असूनही हॅकर माेठ्या संख्येने प्रवेशपत्र लीक करू शकतात. ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेतानाही प्रश्नपत्रिका लीक हाेण्याचा प्रकार घडू शकताे, अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यासह महाराष्ट्रासह इतर राज्यांतही पूर्वी झालेल्या ऑनलाइन परीक्षेच्या आयाेजनात अनेक तांत्रिक अडचणी आणि घाेटाळे झाल्याचेही उघडकीस आले आहे. ऑनलाइन माध्यमातून साेडविलेला पेपर पुन्हा लाॅगिन करून साेडविता येऊ शकताे. ऑनलाइन प्रणालीमध्ये कुठे घाेळ झाला आहे, हे लवकर निदर्शनास येत नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येईल, असे आयाेगाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पाेलिस उपअधीक्षक यांसारखी महत्त्वाची माेठी पदे भरण्यात येतात. मात्र, नुकत्याच घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर या पदासाठीच्या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेतल्या जाव्यात, असे नितीन आंधळे या विद्यार्थ्याने सांगितले.
प्रवेशपत्र लीक करणाऱ्यावर गुन्हा
स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन नसल्याने काेणत्याही पद्धतीने त्या मिळविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आयाेगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीडी, बेलापूर पाेलिस ठाणे, नवी मुंबई येथे प्रवेशपत्र लीक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर आम्ही रस्त्यावर उतरून विराेध करू
एमपीएससीतर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा तसेच गट ‘ब’ तसेच गट ‘क’च्या मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आयाेगाने जाहीर केले आहे. मात्र, या निर्णयास आमचा तीव्र विराेध आहे. आयाेगाने एमपीएससीने महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदाेलन करू.
-महेश घरबुडे, समन्वयक, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, पुणे.