एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:57 PM2022-06-10T13:57:26+5:302022-06-10T14:00:01+5:30

एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते?...

MPSC UPSC is next to those who fail frequently pune latest new | एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

Next

पुणे : दरवर्षी यूपीएससी अथवा एमपीएससीची तयारी करणाऱ्यांची संख्या काही लाखांत असते. मात्र, यातून केवळ ५०० ते १०००च्या आसपास पदभरती होते. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्यक्ष यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या पाहता. प्रचंड मोठी दरी पाहायला मिळते. मग जे विद्यार्थी यशस्वी होत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे राहतात. वारंवार अपयश येत असलेल्या विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान ठेवून करिअरच्या आयुष्याची घडी सुरळीत बसवण्यासाठी दुसरा पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते?

राज्यभरातून १० ते १२ लाख विद्यार्थी विविध एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांचा यामध्ये समावेश असतो. खासगीपेक्षा सरकारी नोकरी कधी चांगली असते. तसेच समाजात मानसन्मान असणारी नोकरी म्हणूनदेखील पाहिलं जाते. सरकारी नोकरी ही सुरक्षित असल्याने त्याकडे तरुणांचा कल जास्त असतो.

सरकारी नोकरी मिळावी म्हणून राज्यभरतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रयत्न करताना दिसतात. परिणामी या क्षेत्रात जास्त गर्दी झालेली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी, वर्षाचा खर्च एक लाख

पुण्यात अभ्यासाची तयारी करताना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपयांपर्यंत खर्च येताे. दोन वेळचे जेवण, खोली भाडे (रूम) अभ्यासिका आदींचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षाला जवळपास दीड लाख रुपये प्रतिविद्यार्थी खर्च येत आहे, तर पुण्याऐवजी दिल्लीमध्ये प्रतिविद्यार्थी प्रतिमहिना दुप्पट म्हणजे १५ ते २० हजार रुपयांचा खर्च येत आहे.

दोन टक्के यशस्वी होतात, ९८ टक्क्यांचे काय?

सरकारी कार्यालयात १ ते २ टक्के रिक्त जागा असतात. मात्र, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता खूप मोठी तफावत पाहायला मिळते. परीक्षांचा निकालही केवळ १ ते २ टक्के लागतो. राज्यातील अनेक विभागांत जागा रिक्त आहेत. मात्र, सरकारची नोकरभरती करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे नोकरीभरतीला अडचण येत आहेत. बेरोजगारीचा आलेख वाढत आहे. अनेक जागा रिक्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे इतरांवर कामाचा ताण येत आहे, अशी अनेक कारणे आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.

दुसरा पर्याय असायलाच हवा

स्पर्धा परीक्षेची सुरुवात करतानाच प्लॅन ‘बी’ हा प्रत्येक विद्यार्थ्यांने ठरवायला हवा; कारण ६ ते ८ वर्षे तयारी करूनही सरकारी नोकरी लागलीच नाही तर काय, असा प्रश्न प्लॅन ‘बी’ असल्यास पडत नाही. परंतु, ६ ते ८ वर्षांचा गॅप आणि व्यावसायिक शिक्षण यांमुळे खासगी नोकरी मिळवताना अडचणी उभ्या राहतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अनेक क्षेत्रांत हे विद्यार्थी चमकू शकतात. यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन पर्याय मार्ग शोधून ठेवणे आवश्यक आहे.

- सचिन हिसवणकर, शिक्षणतज्ज्ञ

वारंवार अपयशाने खचू नका

पद मिळवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी या क्षेत्राकडे वळतात. प्रेरणा घेण्यात काहीही गैर काही नाही. मात्र, त्यात खोटा आत्मविश्वास नको. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतानाच आपल्या क्षमता तपासूनच निर्णय घ्यावा. आपली ताकद काय, नकारात्मक बाजू कोणत्या या ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. या स्पर्धेत प्रत्येक जण यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता दुसरा पर्याय निवडल्यास तेथे आर्थिक फायद्याबरोबर मानसिक समाधानही मिळेल.

- शिरीष शितोळे, मानसोपचार तज्ज्ञ

वय ओलांडू लागले, पुढे काय?

स्पर्धा परीक्षेची तयारी सहा वर्षांपासून करत आहे. या सहा वर्षांत केवळ दोन परीक्षा मला देता आल्या आहेत. कारण एकच परीक्षेची प्रक्रिया तीन-तीन वर्षे सुरू असते. त्यामुळे संधी कमी होतात आणि यशाचा भरवसादेखील मिळत नाही. वय वाढत असल्याने घरून तसेच नातेवाइकांकडून सतत विचारणा होते. हातात काही नसल्याने नैराश्य येते. पुढे काय, असे प्रश्न निर्माण होतात. मात्र, सरकारच्या अनास्थेमुळे काहीही मार्ग निघत नाही.

- शिवाजी, विद्यार्थी

Web Title: MPSC UPSC is next to those who fail frequently pune latest new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.