मुख्यमंत्री महोदय...कोरोना फक्त रात्रीच फिरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:41+5:302020-12-23T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रात्री अकरा ते पहाटे सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्री अकरा ते पहाटे सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रात आणली अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का असा त्रस्त सवाल हॉटेल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुण्यात हॉटेल असोसिएशनचे ३ हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे. संघटनांच्यावतीने ही नाराजी सरकारपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. सलग ६ महिन्यांच्या बंदीनंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर मागील महिनाभरात व्यवसाय सुरळीत होत होता. नाताळात चांगला व्यवसाय होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आता सरकारच्या निर्णयाने त्यावरही पाणी पडले असल्याचे हॉटेलचालक बोलून दाखवत आहेत.
सध्या त्यांना रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी असली तरी साडेदहा वाजल्यापासूनच त्यांना आवराआवर करावी लागत होती. हीच वेळ रात्री १२ पर्य़ंत वाढवण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती. ते तर झालेच नाही उलट ११ नंतर संचारबंदी आणली गेली. त्यामुळे आता दहा वाजल्यापासूनच आवरते घ्यावे लागणार आहे.
चौकट
“सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. त्या विरोधात आम्ही दाद मागत आहोत. रात्री १२ पर्यंतच्या परवानगीची आमची मागणी सोडून सरकारने हा असा निर्णय घेतल्याने पुन्हा आमच्यावर आर्थिक संकट येणार आहे.”
-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन
चौकट
“सरकारचे धोरणच लक्षात यायला तयार नाही. कोरोनाचे संकट मोठेच आहे, मात्र त्यावर अशी बंदी वगैरे घालून मार्ग निघणार नाही.”
-किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन
चौकट
“काहीतरी कारण असल्यामुळेच सरकारने असा निर्णय घेतला असावा असे आम्ही समजतो. यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
-विक्रमराज शेट्टी, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया हॉटेल अँन्ड रेस्टॉरंट असोसिएशन.