"शाळेत पेढा अन् गोल बिल्लाही मिळाला", स्वातंत्र्याची पहाट पाहणाऱ्या प्रा. श्री. द. महाजन यांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:52 PM2022-08-10T16:52:50+5:302022-08-10T16:53:31+5:30
पहिल्या दिवशी शाळेला सुटी नव्हती, तिथे जाऊन आम्ही नाचलो, गायलो अन् खूप मजा केली. हा अनुभव ‘लोकमत’ला सांगितला आहे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी.
स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री आम्ही पारतंत्र्यात होतो आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्याची पहाट आम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे सर्व वातावरण भारावलेले होते. आपल्या स्वतंत्र भारत देशात आपण आता जगणार आहोत, ही भावनाच आम्हाला खूप आनंद देऊन जात होती. पहिल्या दिवशी शाळेला सुटी नव्हती, तिथे जाऊन आम्ही नाचलो, गायलो अन् खूप मजा केली. हा अनुभव ‘लोकमत’ला सांगितला आहे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी. ते तेव्हा दहावीमध्ये शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग नव्हता, परंतु, स्वातंत्र्याची पहाट त्यांनी अनुभवली.
आमचा बुधवार पेठेत वाडा होता. ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिराच्या अगदी जवळ. बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयात माझे लहानपणीचे शिक्षण झाले. शाळेची दगडी इमारत १८८२ मध्ये बांधण्यात आलेली. अजूनही तशीच आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुणे हे मुंबईत प्रांतामध्ये होते. सर्वात मोठी शाळा ही नूतन विद्यालयच होती. जेव्हा १९४२ मध्ये चले जाव चळवळ सुरू होती. तेव्हा आम्हाला त्याविषयी माहिती कानावर येत होती. १९४२ ते ४७ दरम्यान ही चळवळ मोठी झाली. एकदा या चळवळीत इंग्रजांनी बुधवार पेठेजवळून रणगाडे नेले होते. गोळीबारात आमच्या शाळेच्या काचा फुटल्या. त्यामुळे आम्हाला सुटी देण्यात आली. ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर खूप अत्याचार केले. त्याची माहिती आम्हा विद्यार्थ्यांना होती. १९४२ च्या चले जाव चळवळीपासून आम्ही सर्वजण भारावलेले होतो. स्वातंत्र्य कधी मिळणार यासाठी आसुसलेले होतो. आमचे शिक्षक टिळक, आगरकर, भगतसिंग यांच्या विषयी माहिती देत असत. अखेर भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ठरली. १५ ऑगस्ट १९४७. पण त्या स्वातंत्र्याला दु:खाची झालर होती. देशाची विभागणी झाली होती. पाकिस्तान वेगळा झाला. प्रचंड गदारोळ झाला.
स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री आम्ही पारतंत्र्यात होतो आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यात होतो. सकाळी जागे झालो ते स्वतंत्र भारतामध्येच. तेव्हा आम्हाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुटी दिली नव्हती. कारण स्वातंत्र्य दिन शाळेत साजरा करायचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याला एक पेढा देण्यात आला. तसेच एक गोल बिल्लाही मिळाला. त्यावर १५ ऑगस्ट १९४७ असे लिहिलेले होते. ते सर्व पाहून आम्ही हुरळून गेलो. आपले इतक्या वर्षांचे स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. तोपर्यंतच्या आयुष्यात कधीच इतका आनंद झाला नव्हता, एवढा स्वातंत्र्याच्या दिवशी झाला. शाळेत सर्वजण नाचलो, ओरडलो. सर्वांना आनंदाचं भरतं आलं होतं. त्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी वर्गात अभ्यास काही झाला नाही. सर्वजण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यातच गुंग होते. आम्हाला शिक्षकांनी स्वातंत्र्याची माहिती दिली.
दरम्यान, अगोदर महात्मा गांधी यांना आगाखान पॅलेस येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना नगरला तुरुंगात ठेवले होते. आम्हा मुलांना महात्मा गांधी यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. त्यामुळे आठ-दहा जणांनी ठरवले की, गांधीजींना भेटायचेच. मग घरी व शिक्षकांना सांगितले आणि पायी चालत चालत, पत्ता विचारत आगाखान पॅलेस इथे गेलो. तोपर्यंत प्रार्थनेला आत सोडण्याची वेळ संपली होती. आगाखान पॅलेस येथे सायंकाळी महात्मा गांधी प्रार्थना सभा घ्यायचे. त्या प्रार्थनेला नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी इंग्रजांनी दिली होती. आम्ही गेटवर उभे होतो. तिथल्या ब्रिटिश साहेबांनी आम्हाला पाहिले. त्यांनी आत सोडायला सांगितले. मग हळूहळू दबकत प्रार्थनेला जाऊन बसलो. ते हिंदीमध्ये बोलत होते. ते काय बोलत होते, समजत नव्हतं, पण आम्ही त्यांच्याकडे पाहूनच भारावलो होतो.
प्रार्थना संपल्यानंतर प्रत्येकजण गांधीजींना आपलं नाव सांगून त्यांचे चरणस्पर्श करत होता. गांधीजी प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देत होते. मी समोर गेलो आणि माझ्याही पाठीवर त्यांनी हात ठेवला. मी माझे नाव सांगितले. त्यानंतर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना भेटून परत आल्यावर शाळेत आम्ही सर्वांना सांगितले, तेव्हा सर्व मित्रमंडळी कौतुकाने आमच्याकडे पाहू लागली. शिक्षक, घरचे सर्वांनी शाबासकी दिली होती.
जेव्हा आपण स्वतंत्र झालो, त्या वेळी गांधीजींच्या कार्याचे मोठेपण समजले. त्या राष्ट्रपित्याचा हात माझ्या पाठीवर पडल्याची भावना आजही मनाला खूप आनंद देऊन जाते. परंतु, तेव्हा मिळालेला स्वातंत्र्याचा आनंद हा निर्भेळ नव्हता, तर त्याला देशाच्या विभागणीच्या दु:खाची झालर होती.
...ही खंत आज मनात आहे!
आज जेव्हा देशाची अवस्था पाहतो, तेव्हा खंत वाटते. कारण ज्या प्रमाणे देशाने प्रगती करायला हवी होती, ती आज देखील झाली नाही. देशात आजही शिक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपासच आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ही पर्यावरणाची हानी भरून न येणारी आहे.
इंडिया नको भारत
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. १९४८ साली श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी सिलोन नाव केले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिलोनचे श्रीलंका नाव केले. ब्रह्मदेशने देखील स्वातंत्र्यानंतर जुने नाव म्यानमार केले.
(शब्दांकन : श्रीकिशन काळे)