भारताच्या ललितची विजयी सुरुवात; महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 10:03 AM2022-06-01T10:03:59+5:302022-06-01T12:12:23+5:30
बालेवाडी येथे सुरू असलेल्या स्पर्धेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
पुणे : भारताचा दुसरा मानांकित बुद्धिबळपटू एम. आर. ललित बाबू याने पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सुरुवात केली. अटीतटीच्या सामन्यात त्याने जोशुआ एपीला पराभूत केले. ताझिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनातोवनेही विजयी सुरुवात केली.
बालेवाडी येथे सुरू असलेल्या स्पर्धेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मेंटॉर अशोक जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि डॉ. परिणय फुके यांचीही उपस्थिती होती. अव्वल मानांकित फारुखने भारताच्या अनिष गांधीविरुद्ध सहज बाजी मारताना आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्याने सफेद मोहऱ्यांनी खेळताना अनिषला ३५ चालींमध्ये नमवले.
भारताच्या ललितने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मोक्याच्या वेळी शानदार चाल करीत जोशुआला दबावात आणले. त्याने ४४ चालींच्या खेळामध्ये जोशुआला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. चौथ्या मानांकित एलेक्सेई फेडेरोवने तेजस्विनी सागरचा ४३ चालींमध्ये पराभव केला. पाचवा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ताने अतुल दहालेचा सहज पराभव करीत विजयी कूच केली.