मृणाल गांजाळे शिंदे यांना तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:53+5:302021-07-03T04:07:53+5:30
राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण परिषद (एनसीइआरटी) नवी दिल्ली यांच्या वतीने मृणाल गांजाळे-शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ...
राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण परिषद (एनसीइआरटी) नवी दिल्ली यांच्या वतीने मृणाल गांजाळे-शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार मृणाल गांजाळे-शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पिंपळगाव तर्फे महाळुंगे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कांतीलाल दंडवते व माता-पालक संघाच्या वतीने सुवर्णा सचिन तोडकर यांच्या हस्ते मृणाल गांजाळे-शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक सुधीर चिखले, शशिकांत थोरात, माणिक बाजारे, सचिन पालेकर, सुनील वाघ, मच्छिंद्र चासकर, आरती निमोंकर, मोनिका थोरात, अनिता पोखरकर, रोहिणी लोंढे, शशिकला साबळे, वैशाली इंदोरे आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना मृणाल गांजाळे–शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यात तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करत तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यासोबत तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे नावीन्यपूर्ण व सकारात्मक प्रयोग केले. त्यांच्या या कामांचा विचार करून त्यांना तंत्रस्नेही शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
चौकट:
काळानुरूप शिक्षणात बदल केला पाहिजे हे माझे मत आहे. त्या अनुषंगाने मी तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात केला. मुलांना आणि इतर शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वर्गात सर्वोत्तम वापर करण्यास सक्षम बनविणे हे माझे ध्येय आहे. जेणेकरून शिक्षकांनी शिकवण्याच्या आणि विद्यार्थ्यांनी शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यावा.
-मृणाल गांजाळे-शिंदे
फोटो : केंद्र सरकारचा तंत्रस्नेही शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबाबद्दल मृणाल गांजाळे-शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.